शेतकऱ्याचा देशी जुगाड घरीच बनवला फवारणीचा `नंदी` ब्लोअर
ट्रॅक्टर आणि ब्लोअरच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सहा ते सात लाख रुपये मोजावे लागतात. हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खूनेश्वर या गावातील ज्ञानेश्वर चव्हाण शेतकऱ्याने देशी जुगाड करत बैलावर चालणारा नंदी ब्लोअर बनवला आहे. हा नंदी ब्लोअर केवळ चाळीस हजार रुपयात तयार झाला आहे,प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट;
सोलापूर :भारत हा कृषी प्रधान देश समजला जातो. या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेत अमूल्य असा वाटा असून या क्षेत्रावर देशातील जनता अवलंबून आहे. तसेच अनेक क्षेत्र या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. याच शेतीतून उद्योगधंद्यांना आवश्यक असणारा कच्चा माल पुरवला जात असून देशातील जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे काम हेच क्षेत्र करत आहे. पण या क्षेत्रावर अलीकडच्या काळात नैसर्गिक संकटे ओढली जात आहेत. याला अनेक कारणेही आहेत. मानवाने विकाच्या नावाखाली निसर्गाची केलेली अपरिमित हानी याला जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निसर्गाचा प्रकोप झाल्यास त्याचे परिणाम शेती क्षेत्राला भोगावे लागत आहेत. निसर्गाचे गणित बिघडल्याने कधी जास्त पाऊस होतो तर कधी पाऊसच पडत नाही. त्यामुळे शेती क्षेत्र अनिश्चिततेचे क्षेत्र मानले जात आहे.
शेती क्षेत्राला पुर,पाऊस याचा कधी फटका बसेल हे सांगता येत नाही. यामध्ये शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेले पिके वाहून जातात. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनावर होतो. पाण्याच्या सुविधा वाढल्याने अलीकडच्या काळात शेती क्षेत्र विस्तारले असून सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी आली आहे. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाच्या पिकाबरोबरच फळबागा यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून याचबरोबर केळी,टोमॅटो,दोडका,भोपळा,पालेभाज्या यांचे उत्पादन ही वाढले आहे. या फळबागा,पालेभाज्या वरील पडलेल्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. जिल्ह्यात द्राक्षे बागांचे प्रमाणात जास्त असून त्यांच्यावर सातत्याने फवारण्या कराव्या लागतात. यासाठी शेतकरी लहान ट्रॅक्टर आणि फवारणीच्या ब्लोअरचा उपयोग करतात. ट्रॅक्टर आणि ब्लोअरच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सहा ते सात लाख रुपये मोजावे लागतात. हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खूनेश्वर या गावातील शेतकऱ्याने देशी जुगाड करत बैलावर चालणारा नंदी ब्लोअर बनवला आहे. हा नंदी ब्लोअर केवळ चाळीस हजार रुपयात तयार झाला असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बोलताना सांगितले. या नंदी ब्लोअरला एकच म्हैस,बैल जुंपून पिकांची फवारणी करता येते. चव्हाण यांच्या या अनोख्या नंदी ब्लोअरची सध्या सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा असून हा नंदी ब्लोअर पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देवू लागले आहेत.
शेती क्षेत्रातील अवजारांच्या वाढत्या किंमतीमुळे सुचली देशी ब्लोअरची कल्पना
दिवसेंदिवस शेती क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्राकडे तरुण वर्ग वळताना दिसत आहे. ते या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. शेतात वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग होताना दिसत असून त्याचा फायदाही या तरुण शेतकऱ्याना होत आहे. पूर्वीच्या काळी निव्वळ पावसावर अवलंबून असणारी कोरडवाहू शेती आता बागायती झाली आहे. उजनी धरणामुळे जिल्ह्यातील बरेच शेती क्षेत्र ओलिताखाली आले असून त्यामुळेच जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचबरोबर दिवसेंदिवस साखर कारखान्यांची संख्या ही वाढताना दिसत आहे. शेती क्षेत्राचा विस्तार वाढू लागल्याने या क्षेत्राला पूरक असणारे उद्योग व्यवसायाची संख्याही वाढली आहे. यामध्ये कृषी केंद्र,अवजारे यांच्या व्यवसायाचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. याचबरोबर शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करू लागला आहे. त्याच्याकडे दूध देणारी जनावरे वाढली आहेत. या दुधावर असणाऱ्या उद्योगधंद्याची संख्याही वाढली आहे. तसेच अनेक शेतकरी पोल्ट्रीच्या व्यवसायात उतरले आहेत. याच्यातून ही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होताना दिसत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र कमी आहे. त्यांना हे उद्योग व्यवसाय उभा करता येत नाहीत.
त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे बाजारातील बी-बियाणांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून पिकावरील फवारणीच्या औषधांच्या किंमतीत ही सातत्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खतांच्या किंमती गगनाला भिडल्या असून त्याच्यामुळे ही शेतकरी अडचणीत आला असल्याचे दिसून येते. अलीकडच्या काळात वाढत्या महागाईमुळे शेत मजुरांच्या रोजगारात ही वाढ झाली आहे. अवेळी येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. शेतीचे पीक चांगले जोमात आले तर मध्येच अवकाळी पाऊस येवून हातातोंडाला आलेले पीक वाया जावून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेती ही बेभरवशाची झाली असून शेतकऱ्यांच्या मालाला कधी भाव मिळतो तर कधी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत असल्याचे दिसतो. शेती क्षेत्राशी निगडित असणाऱ्या शेती अवजारांचा किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी पैशात उपलब्ध होईल,असा नंदी ब्लोअर तयार करण्याची कल्पना शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांना सुचली व त्या दृष्टीने त्यांनी साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली आणि फवारणीच्या ब्लोअरचा प्रयोग यशस्वी केला.
चाळीस हजारात बनवला फवारणीचा नंदी ब्लोअर
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले,की बागेच्या फवारणीची साधने खरेदी करण्यासाठी सहा ते सात लाख रुपये खर्च येतो. शेतीची फवारणी करायची म्हटल्यास तीन ते चार मजूर लागतात. या मजुरांना चारशे ते पाचशे रुपये हजेरी द्यावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना नळीवरची फवारणी परवडत नाही. यासाठी नंदी ब्लोअर घरीच तयार करण्याचे ठरवून साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला टू-व्हीलर गाडीची दोन चाके आणली. त्यापासून बागेत फिरणाऱ्या आकाराचा गाडा तयार केला. ब्लोअर तयार करण्यासाठी एसटीपी पाईप,इंजिन,दोनशे लिटरचा साधा ड्रम खरेदी करण्यात आला. एसटीपी तयार करत असताना दोन्ही बाजूला घन जोडून तयार करण्यात आला. या ब्लोअरच्या पुढच्या बाजूला बैल जोडण्यात आला. त्यामुळे या ब्लोअरला नंदी ब्लोअर नाव पडले. या नंदी ब्लोअरच्या मदतीने फवारणी केलेली पिके चांगल्या प्रकारे आली असून पहिल्या वर्षी शेतीचा माल 52 रुपये किलोने विकला गेला. या मालाचा दर्जा पण चांगला होता. सरासरी शेती माल 25 टनाच्या आसपास निघाला होता. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे लहान एसटीपी होता. त्याच्यावर फवारणी व्यवस्थित होत नव्हती. आताच्या ब्लोअरला 5 hp चे इंजिन बसविण्यात आले असून त्यामुळे बागा फवारण्याचे काम वेगाने होत आहे.
पैशाची आणि वेळेची होतेय बचत
या देशी नंदी ब्लोअरमुळे शेतकऱ्याच्या वेळेची बचत होत असून बागेवर फवारणी करत असताना चारही बाजूने होते. फवारणीसाठी लागणाऱ्या मजुरांची बचत होते. विशेष म्हणजे भर पावसात ही फवारणी करता येते. कमी खर्चात घरीच हा नंदी ब्लोअर तयार करता येतो. त्यामुळे अनेक शेतकरी चव्हाण या शेतकऱ्याकडे देशी जुगाड करून बनवलेला नंदी ब्लोअर तयार करून देण्याची मागणी करू लागले आहेत.