धाराशिव जिल्ह्यातील 2022 सालच्या पिक विमा संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी विमा नुकसानीच्या प्रमाणात न मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत, शेतकऱ्यांनी यासंदर्भात दिलेली निवेदने अपील म्हणून ग्राह्य धरण्यात येतील व त्याआधारे राज्य तक्रार निवारण समिती शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देईल. संबंधित विमा कंपनीच्या नफ्यातून वसुली करून शेतकऱ्यांना विमा वितरण केले जाईल, याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.
आ.कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते. जिल्हा तक्रार निवारण समितीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विमा प्रश्नी 50 % विमा दिल्यानंतर ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यावर सुनावणी घेतली, उच्च न्यायालयात यासंदर्भात दाखल प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिली, त्यानंतर आता राज्य तक्रार निवारण समिती शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून आर आर सी मधून वसुली करून उर्वरित विमा वितरित करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.