हरभरा - आधारभाव खरेदी विषयक नोंदी
रब्बी हंगामात प्रमुख पीर ठरलेल्या हरभरा तील महाराष्ट्रातील लागवड, उत्पादन तेजी मंदी बद्दल लिहीत आहे कृषी अभ्यासक दीपक चव्हाण..;
यंदाच्या रब्बीत महाराष्ट्रात 25 लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होता. राज्यासाठी हरभरा हे रब्बीतील प्रमुख पीक ठरले आहे. हेक्टरी उत्पादकता 1.2 टन गृहीत धरली तर राज्यात 30 लाख टन उत्पादन अनुमानित\अपेक्षित आहे.राज्यातून या वर्षी 5100 रुपये प्रतिक्विंटल आधारभावानुसार 6 लाख टन हरभरा खरेदीचे उदिष्ट नाफेडला मिळाले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून 3.7 लाख टन हरभरा आधारभावाने खरेदी झाला होता. त्या तुलनेत यंदा उदिष्ट वाढून आले आहे. वरील उदिष्टाची प्रभावी अंमलबजावणी झाली तर राज्यातील एकूण हरभरा उत्पादनातील 20 टक्के भाग आधारभावाने खरेदी होईल.
तरीही 80 टक्के माल आधारभावाच्या कक्षेबाहेर, ओपन मार्केटमध्ये ट्रेड होईल.
आजघडीला ओपन मार्केटमध्ये आधारभावाच्या तुलनेत दहा टक्क्यांनी किंमती खाली राहत आहेत.खासकरून हरभऱ्यासंदर्भात केंद्र सरकार दरवर्षी खरेदीचे उदिष्ट वाढवत आहे. तरीही बाजारातील एकूण उत्पादित आकारमानाच्या तुलनेत ते उदिष्ट कमी पडतेय. म्हणूनच गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत हरभऱ्याचे भाव आधारभावाच्या खाली होते. शेतकऱ्यांकडील मालाची आवक संपल्यानंतर सप्टेंबरपासून पुढे तीन महिन्यांसाठी हरभऱ्याचा बाजार गेल्या वर्षीच्या 4850 प्रतिक्विंटल आधारभावाच्या वर ट्रेड झाला. पण, नाफेडकडील शिल्लक साठ्यांच्या विक्रीचा दबाव वाढताच बाजार पुन्हा आधारभावाच्या खाली गेला. यंदा तसे घडू नये, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
वरील नोंदी केवळ माहितीसाठी आहेत. येत्या काळातील तेजी-मंदीशी कृपया संबंध जोडू नये.
- दीपक चव्हाण