बीड येथे शेतकरी संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा
बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.;
बीड : बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर नगर रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, दरम्यान यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
2020 खरीप हंगामात जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांनी 60 कोटी रुपये भरले, त्यामध्ये केवळ वीस हजार शेतकऱ्यांना 13 कोटी 46 लाख रुपयांची नुकसान भरपाई म्हणून विमा मिळाला आहे. चार लाख शेतकरी पात्र असताना देखील हा विमा या शेतकऱ्यांना का दिला नाही? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
यातील 698 कोटी पैकी 625 कोटीची रक्कम शासनाला परत गेली आहे. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी, अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगा थावरे यांनी दिले.