शेतकऱ्यांच्या विरोधातले राजकारण भाजप करत आहे - नाना पटोले
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूर येथे भाजपवर चौफेर टिका केली. त्यांनी यावेळी विविध मुद्द्यावर भाष्य केले. ते नेमके काय म्हणाले ते वाचा मॅक्स महाराष्ट्रवर...;
भाजप (BJP) शेतकरी (Farmers) विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patol) यांनी नागपूरात लगावला आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या हाती पीक येते, तेव्हाच सरकार आयात शुल्क कमी करतात आणि शेतकऱ्यांना दर मिळाला नाही असे धोरण राबवतात. भाजप त्यांच्या व्यापारी मित्रांचा फायदा कसा होईल याकडे सर्वाधिक लक्ष देत असल्याचा आरोप पटोले यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना केला. सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कापूस घरी पडलेला आहे. त्याला कीड लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. कापूस, तूर, धान, कांदा या सर्व पिकांना सडवण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्येच आम्ही असे ठरवले आहे की, जे जे भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील, त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊ, भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे. न्यायव्यवस्था आणि प्रशासनामध्ये त्यांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यामुळे भाजप विरोधातल्या सर्व लोकांना राष्ट्रीय पक्षांना सोबत घेऊन देशाचे संविधान आणि देश वाचवण्यासाठी काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे. जे या विचाराने सोबत येतील, त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची (Congress) भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील शहरांची नावे बदलल्याने शेतकऱ्यांचा फायदा, बेरोजगारांचा फायदा, महागाई कमी होत असेल, तर सर्व शहरांची नावे बदला. मात्र मानवी गरजांकडे दुर्लक्ष करून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा काम करत आहोत, तेव्हा भाजप (BJP) लोकशाहीमध्ये जी क्रूरता निर्माण करत आहे, त्या विरोधात एकत्रित लढण्यास आमचा कोणालाही विरोध नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले. अशोक चव्हाण (Ashok Chavan) योग्यच बोलल्याचे पटोले यांनी सांगितले. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जनतेचे प्रश्न उचलतो तेव्हा केंद्र आणि राज्य सरकार आमच्या विरोधात आरोप लावते, आमच्या चौकशा करते, आमच्या मतदारसंघातील कामावर बंदी आणली जाते. महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू करण्यात आला आहे. विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यावरची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्याचे मी समर्थन करतो, असे पटोले यावेळी म्हणाले. तसेच यावेळी नाना पटोले यांनी होळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. होळीमध्ये सत्तेत बसलेल्यांना सदबुद्धी यावी, अशी होळी (Holi) मातेला माझी प्रार्थना असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.