केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
केंद्राकडून राज्याच्या कृषी विभागाची विनंती मान्य
पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत फळ पीकविमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी फळ पीकविमा योजनेत विहित वेळेत सहभागी होऊ शकले नाहीत. म्हणुन आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती, केंद्र सरकारने याची दखल घेऊन अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेण्यासाठी ०३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 2, 2023
पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास 31 ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आली होती. 31 ऑक्टोबर पर्यंत सुमारे 45 हजार 731 अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. काहि तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
धनंजय मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून, 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. धनंजय मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा, असे आवाहनही केले आहे.