कंत्राटी शेतीत फसवणूक झालेला शेतकरी कंत्राटदाराविरुद्ध का लढू शकत नाही?
केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांवरुन देशभरात रणकंदन सुरु असताना कंत्राटी पध्दतीने शेती करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब पवार आणि त्यांच्या दोन भावांना कंत्राटी शेतीतून मनस्ताप करणारा अनुभव आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब पवार आणि त्यांच्या दोन भावांनी पाच एकर शेतात करार पद्धतीने टरबूज लावले होते. यात कंपनी आणि व्यपारी यांच्यासोबत लेखी करार सुद्धा झाला.करारानुसार फळ काढण्यायोग्य झाल्यावर चार किलोपेक्षा अधिक वजनाचे टरबूज 7 रुपये किलोने घेण्याचं ठरलं होतं. त्यामुळे फळ काढण्या सारखं झाल्यावर पवार यांनी करार करून दिलेल्या कंपनी आणि व्यापारी यांना फोन करून टरबूज घेऊन जाण्याचं सांगितले. मात्र व्यापाऱ्यांने आज-उद्या करत तब्बल आठ दिवस उशीर लावला. त्यांनतर मात्र हा माल आता पिकला असून खरेदी करू शकत नसल्याचं म्हणत फळ विकत घेण्यास नकार दिला आहे.
याविषयी बोलताना शेतकरी भाऊसाहेब पवार म्हणाले, ऐनवेळी फळ विकत घेण्यासाठी नकार मिळाल्याने शेतकरी पवार हतबल झाले आहेत. शेतात टरबूज सडत आहे.. त्यात हा टरबूज एक्सपोर्ट क्वालिटी असल्याने स्थानिक बाजारपेठात कुणी विकत घेत नसून योग्य भाव सुद्धा मिळत नाही.तर करार केलेले व्यपारी आता फोन केल्यावर धमक्या देत असून काय करायचं करून घ्या असं दम शेतकऱ्यांना देत आहे.
शेतकरी म्हणाले, करार पद्धतीने टरबूज लागवड करण्यासाठी 60 ते 62 हजार रुपये खर्च आला असून, हातात मात्र अजूनही रुपया सुद्धा आला नाही... त्यामुळे करार पद्धतीने शेती करून फसले आहेत. केंद्राने केलेल्या नवीन कृषी कायद्यात करार पद्धतीने शेती करण्याचा कायदा सुद्धा करण्यात आला असून, हा शेतकरी हिताचा असल्याचा दावा सरकार करतेय.. मात्र प्रत्यक्षात हा कायदा शेतकऱ्यांसाठी फसवा ठरत आहे.