चव्हाणांची बदली ;गेडाम झाले नवे कृषी आयुक्त

नेहमीच वादग्रस्त ठरलेले कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. प्रवीण गेडाम यांची कृषी आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चव्हाण यांच्याकडे जलसंधारण सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.;

Update: 2023-10-19 14:00 GMT

सुनील चव्हाण यांची एक वर्षापूर्वी तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आग्रहाने कृषी आयुक्त पदी बदली करण्यात आली होती.

आता ते जलसंधारण सचिव म्हणून काम करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कृषीमंत्री पदी धनंजय मुंडे यांची निवड झाल्यानंतर कृषी आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा होती. त्यानंतर आज प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रवीण गेडाम यांनी सोलापूरमध्ये वाळू उपसा रोखणारा सोलापूर पॅटर्न अतिशय प्रभावीपणे राबवला होता. आता त्यांच्या खांद्यावर राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कृषी आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.

कृषी आयुक्त डॉ. गेडाम हे २००२ मध्ये महाराष्ट्र केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. २००५ मध्ये जळगाव महापालिकेचे आयुक्त, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर व धाराशीवचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्यानंतर २०१७ पासून ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे ते खासगी सचिव होते. आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. सध्या अध्ययन रजेवर होते त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Tags:    

Similar News