African Boer Goat : ऐकून थक्क व्हाल, या तरुणांनी विकली अडीच लाख रुपयाला शेळी

African Boer Goat : तब्बल अडीच लाखाला आफ्रिकन बोअर शेळीची विक्री

Update: 2024-02-10 01:39 GMT

African Boer Goat : तालुक्यातील तांभोळच्या उच्चशिक्षित बंधूंनी शेतीबरोबर शेळी पालनाचा व्यवसाय (Goat Farming Business) करुन उत्पनाचा शाश्वत स्त्रोत तयार केलाय. सध्या त्यांचा हा व्यवसाय जोमात सुरू असून, वर्षाकाठी खर्च वजा जाता अकरा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे. नुकतीच त्यांनी नऊ महिने वयाची आफ्रिकन बोअर जातीची शेळी (African Boer Goat) तब्बल अडीच लाख रुपयांना विकली असून तिला श्रीलंकेला (Sri Lanka) पाठवणार आहे.

शेतीपूरक म्हणून शेळीपालनाची निवड (African Boer Goat)

अकोले तालुक्यातील तांभोळ येथील दत्ता कराळे व सतीष कराळे या उच्चशिक्षित बंधूंनी शेतीला पूरक म्हणून शेळीपालन व्यवसायाची निवड केली. गेल्या तीन वर्षांपासून ते आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या व बोकडांचे संगोपन करत आहे. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी भेट देऊन अभ्यास केला. त्यानंतर देशी शेळ्यांऐवजी आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या गोठ्यात नव्वद छोट्या-मोठ्या शेळ्या आहेत.

एक हजार रुपये किलो दराने विक्री (African Boer Goat)

देशी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर परदेशी असल्या तरी त्यांचे खाद्य मात्र देशी आहे. याशिवाय दोन वर्षांतून तीनवेळा त्या करडांना जन्म देतात. त्यानंतर दोन ते तीन महिन्यातच बोकड विक्रीसाठी तयार होतो. हा बोकड साधारण 20 ते 25 किलोपर्यंत वजनाचा होवून एक हजार रुपये किलोने त्याची विक्री होते. त्यामुळे संगोपन करण्याचा खर्च होवून शाश्वत उत्पन्न मिळते.

नुकतीच नऊ महिने वयाची आणि पन्नास किलो वजनाची शेळी तब्बल अडीच लाख रुपयांना विकली आहे. सांगली जिल्ह्यातील गणेश ढेबे यांनी ही शेळी खरेदी केली असून, ते श्रीलंकेला पाठवणार आहे. एकीकडे दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणणाऱ्या पशुपालकांसाठी कराळे बंधूंचा हा यशस्वी प्रयोग नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.


Tags:    

Similar News