कांदा : लाल, रांगडा, उन्हाळ म्हणजे काय रे भाऊ ?
कोरोनामुळं राज्यभरात मिनी लॉकडाऊन लागू झालाय. गतवर्षीप्रमाणे यंदाही शेतमालाचे हाल सुरू झालेत. या पार्श्वभूमीवर शेती अभ्यासक दीपक चव्हाण यांनी ज्यांचा कांद्याच्या शेतीशी संपर्क नाही, अशा मित्रांना लाल, रांगडा, उन्हाळ यातला फरक समजून सांगत शेतकरी वर्गाला कांदा विक्रीचे मार्गदर्शन केलेय....;
रांगडा किंवा लाल हे लेट खरीपातील कांद्याचे वाण आहेत. रांगडा -लाल कांद्याचा वाण हे दोन आठवड्यापेक्षा जास्त टिकत नाहीत.उन्हाळ किंवा गावठी हे रब्बी हंगामाचे वाण आहे. ते सहा ते आठ महिने टिकतात.रांगडा विका आणि उन्हाळ रोखा - याचा अर्थ असा की सध्या एप्रिलमध्ये दोन्ही वाणांची आवक सुरू आहे. खासकरून रांगडा वाणाची आवक अधिक आहे आणि त्याची विक्री रोखता येणार नाही, टिकवण क्षमता नसल्याने रांगडा विकणे अपरिहार्य आहे...म्हणून अशावेळी टिकणारा उन्हाळ (रब्बी) माल बाजारात आला तर पुन्हा आवक दाटेल व भाव कमी भेटतील. पुढे मे पासून रांगडा माल बाजारात नसणार आणि केवळ उन्हाळ माल असणार. या पार्श्वभूमीवर, एप्रिलमध्ये उन्हाळ माल रोखता येऊ शकतो. आता उन्हाळ वाणाचा माल थांबवलात तर रांगड्याला स्पर्धा होणार नाही, त्यास थोडे उंच दर मिळतील. पुढे जाऊन, मे ते सप्टेंबर या काळातील एकूण देशांतर्गत मागणीच्या तुलनेत उन्हाळ वाणाचे उत्पादन हे जास्त नाही, संतुलित स्वरूपाचे आहे. म्हणून सध्या हजार रुपयात उन्हाळ विकण्यापेक्षा मे पासून पुढे सध्याच्या तुलनेत किफायती दर राहू शकतील. म्हणून टिकवण क्षमता असणारा उन्हाळ थांबवा आणि न टिकणाऱ्या रांगड्याला वाट मोकळी करून द्या, जेणेकरून दोन्ही वाणांना वाजवी दर मिळू शकतो, असे म्हणणे आहे.
एप्रिल महिन्यात 'रांगडा विका, उन्हाळ रोखा'
कांदा उत्पादकांच्या मोहिमेला आज (मंगळवार) चांगला प्रतिसाद मिळाला असून, उन्हाळ कांदा आवक 'लाल'च्या तुलनेने खूप कमी असल्याचे व्यापारी मित्रांनी कळवले आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांत आज सर्वसाधारणपणे रांगडा कांदा 70 टक्के तर उन्हाळ कांदा 30 टक्के याप्रमाणे आज आवक झाल्याचे व्यापारी मित्राचे निरीक्षण आहे.खराब बियाण्यांमुळे उन्हाळ कांद्यात 10 ते 15 टक्के लेट खरीप कांदा उगवला आहे. डिसेंबरमधे उन्हाळ कांद्याबरोबर रांगड्याचीही लागण झाली आहे. परिणामी, संपूर्ण एप्रिल महिन्यात टिकाऊ क्षमता नसलेल्या रांगडा कांद्याची आवक सुरू राहिल. मे महिन्यात उन्हाळ कांद्याला स्पर्धा नसणार आहे. शिवाय, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किफायती राहतील, अशी परिस्थिती आहे.बाजारभावाचे सोपे सूत्र असे : देशांतर्गत + निर्यातीची मागणी, स्टॉकिस्टकडील मागणी आणि त्या तुलनेत यंदाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाचा रागरंग पाहता, चांगल्या गुणवत्तेच्या उन्हाळ माल शेतकऱ्यांनी किमान 1800 ते 2000 रू. प्रतिक्विंटलच्या खाली विकू नये अशी परिस्थिती आहे.
- दीपक चव्हाण