कंटेनर तुटवडा आणि आतबट्टयाची शेतमाल निर्यात..

न परवडणाऱ्या शेतीला विशेषज्ञ मुल्यवर्धन करा... निर्यात करा.. असे सल्ले दिले जातात. परंतू लागवडीपासून धोरण-लकवा लाभलेल्या शेतीक्षेत्राची परवड निर्यातीपर्यंत कायम आहे. कोरोनानंतरच्या काळात शेतमाल निर्यातीसाठी आवश्यक कंटेनर तुटवडा निर्माण झाल्याने शेतमाल निर्यात आतबट्ट्याची ठरु लागली आहे... संसदेचे आधिवेशन सुरु असताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना याची जाण असावी, अशी अपेक्षा कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे....;

Update: 2021-02-07 06:40 GMT

आग्नेय आशियायी देश - जसे मलेशिया, इंडोनेशिया आदींकडून भारत पामतेलाची आयात करतो, तर त्यांना ऑईलसीड केक, मका, कांदा आदींची निर्यात होते. जहाजांची आवक जावक सुरू असते. " श्रीलंकेपेक्षा मलेशियाचे कंटेनर भाडे स्वस्त पडते," असे एक निर्यातदार म्हणाले. कारण श्रीलंकेहून परतीचे भाडे कंटेनरला सहसा मिळत नाही. कोरोना काळानंतर कंटेनरची उपलब्धता आणि एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापार बाधीत झाला. आजघडीला कंटेनरचा तुटवडा आहे. "खासकरून श्रीलंकेसाठी कंटेनरचे भाडे आता दुपटीवर पोचले आहे," असे चाकण येथील कांदा निर्यातदार श्रीकांत गोरे पाटील म्हणाले.

ड्राय कंटेनर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रेफर कंटेनरमधून कांदा पाठवणे क्रमप्राप्त ठरतेय. त्याने कॉस्ट वाढतेय. शिवाय जीएसटी, हॅंडलिंग कॉस्ट, मालातील घट आदींमुळे निर्यात खर्चात वाढ होत जातेय. व्यवसायात इतकी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे थोडी फार जरी पडतळ लागली तरी चढा-ओढ सुरू होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यांत जूना उन्हाळ कांदा देशांतर्गत सर्क्युलेशनमधूून संपला होता. त्यामुळे नव्या मालास उठाव मिळाला. जानेवारीचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यांत आवकेचा जोर म्हणावा तेवढा नव्हता. कारण या काळात येणाऱ्या आवकेचा मालावर हा ऊळे उगवण्यापासून लागणीपर्यंत निसर्गाची अवकृपा होतीच शिवाय पुढे मर व अवकाळीनेही अडचणी निर्माण केल्या. म्हणून भाव चमकला. पण मागील दोन दिवसांत बाजार पुन्हा पाचशेने तुटले.

येत्या काळात आठवडा दर आठवडा आवका सुधारत जातील. देशभरातील लेट खरीपाचा माल बाजारात येण्यास सुरवात होईल. आवकेच्या फ्लो किती तीव्रतेचा राहिल, यावर बाजारभावाचे गणित असेल. देशात लेट खरीपाची प्रतिएकरी उत्पादकता नेमकी किती आहे, याचे काहीच टोटल लागत नाही. शिवाय, पुढील आठवड्यांतील पाऊसमान कसे राहील, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातबंदी लवकर उठली आहे. बांगला देशासाठी थेट रेल्वेची व्यवस्था आहे. श्रीलंकेसह, आग्नेय आशियायी देशांमध्ये लवकरच निर्यातीसाठी चांगली पडतळ मिळेल. आयातदार देशांना भारतीय कांद्याची प्रतिक्षा आहे. भारतीय कांदा उपलब्ध होताच, स्पर्धक देशांच्या कांद्याला मागणी कमी होईल. भारतीय कांदा कमी वेळेत पोचतो. चांगल्या गुणवत्तेमुळे ग्राहकी जोरदार असते. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत लाल कांद्याची तूट चाळीतल्या जून्या गावरान-उन्हाळ कांद्याने भरून काढली. यापुढे नव्या कांद्याची तूटीची तीव्रता कमी होत जाईल हे नक्की.

Tags:    

Similar News