जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून उस्मानाबाद येथे युवकाची आत्महत्या

Update: 2021-10-06 03:58 GMT

उस्मानाबाद :  जात पंचायतच्या जोखडातून महाराष्ट्राची कधी सुटका होणार असाच प्रश्न उस्मानाबादच्या घटनेवरून पडल्यावाचून राहणार नाही, कारण मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जात पंचायतीने २ लाख रुपयांचा दंड करून त्याच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने उस्मानाबाद येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमनाथ छगन काळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जात पंचायतीच्या जाचाला कंटाळूनच सोमनाथने आत्महत्या केल्याची नातेवाईकांचे म्हणणे आहे, दरम्यान जात पंचायतीच्या पंचांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी ठिय्या दिला होता.

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व सध्या उस्मानाबाद शहरात राहत असलेल्या सोमनाथ काळे याचे त्याच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरविली होती. त्यात सोमनाथला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंड वसूलदेखील करण्यात आला होता. मात्र, उर्वरित १ लाख ८० हजार रुपये वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे तगादा लावला होता. हे पैसे देण्यास उशीर केल्यास घृणास्पद शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी धमकी त्याला दिली जात होती. याच जाचाला कंटाळून सोमनाथ व त्याच्या पत्नीने २२ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सोमनाथची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी सोमनाथचा मृत्यू झाला.असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. दरम्यान नातेवाईकांनी संतप्त होत , याप्रकरणी जात पंचायतीच्या पंचांवर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मृतदेहासह आक्रोश केला.

यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी, संबंधितांवर गुन्हे दाखल करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. 

Tags:    

Similar News