गिरणगावचे अल्केमिस्ट - पंढरीनाथ सावंत

पंढरीनाथ सावंत यांच्यासोबत झालेल्या अनेक भेटींमधून ते माझ्यासाठी पंढरीकाका कधी झाले, हे कळलंच नाही.;

Update: 2025-02-09 15:03 GMT

माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन २००६ साली राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. तेव्हा माझे शिक्षक डॉ. रवी बापट हेसुद्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी मला ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना कार्यक्रमाला बोलवण्यास सांगितले. पंढरीनाथ सावंत आणि माझी ती पहिली भेट. त्यानंतर पंढरीनाथ सावंत यांच्यासोबत झालेल्या अनेक भेटींमधून ते माझ्यासाठी पंढरीकाका कधी झाले, हे कळलंच नाही.

अफाट वाचन आणि व्यासंग, शिवसेना संघटना ते राजकीय पक्षाची वाटचाल, प्रबोधनकार ठाकरेंचं सगळं लिखाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, दुसरे महायुद्ध, हिटलरचं राजकारण अशा गोष्टींचा चालताबोलता एन्साक्लोपिडीया म्हणजे पंढरीकाका. केईम ला शिकत असताना साप्ताहिक मार्मिकच्या ऑफिसला जाऊन पंढरीकाकांसोबत गप्पांचा छंदच मला जडला होता.

पत्रकार होण्याआधी बस कंडक्टर, मुंबई महापालिकेच्या उर्दू शाळेतीव चित्रकला शिक्षक असा हा प्रवास प्रबोधनकार ठाकरेंचे स्वीय सहाय्यक व लेखनिक इथपर्यंत येऊन पोहोचला. श्री साप्ताहिक, दैनिक लोकमत अशा विविध ठिकाणी पत्रकारिता करत बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून साप्ताहिक मार्मिक मध्ये त्यांची संपादक म्हणून नेमणूक होणे, ही त्यांची प्रतिभा, गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आणि अनुभव यांचा सन्मान होता.

शिवसेना या संघटनेचा राजकीय पक्ष होताना ज्या ‘शिवसेना’ या नावावर शिक्कामोर्तब झाले त्या बैठकीत प्रबोधनकार आणि बाळासाहेब या ठाकरे कुटुंबियांव्यतिरिक्त असणारे तिसरे साक्षीदार म्हणजे पंढरीनाथ सावंत. अनेकदा गप्पा सुरू असताना ही बैठक कशी झाली, कोण कुठे बसले होते आणि प्रबोधनकारांचे डोळे कसे चमकले आणि त्यांच्या मुखातून ‘शिवसेना’ या नावाचा कसा उल्लेख झाला, याचा अनेकदा कौतुकाने एकपात्री प्रयोगच ते मला करुन दाखवत.

१९६६ साली शिवसेनेची घोषणा झाली. त्या स्टेजला बाळासाहेबांच्या सोबतीने बांबू-काठ्या आवळणारे आणि स्टेजवर सतरंजी टाकणारी व्यक्ती म्हणजे पंढरीकाका. शिवाजी पार्क येथील पहिल्या सभेत गर्दीतून ‘शिवसेनाप्रमुख’ अशी पहिली घोषणा देणारी व्यक्ती कोण होती आणि ती दादरला कुठे राहायची ते घर पंढरीकाकांनी त्या रस्त्यावरून जाताना मला अनेकदा दाखवले आहे.

शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळात मातोश्रीच्या बैठकीत आमदार, खासदार, मंत्री ठरायचे. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी बसलेल्या पंढरीनाथांना बाळासाहेब विचारायचे, “पंढरी तुला काय हवंय?” यावर बाळासाहेबांचा हात हातात घेऊन ते म्हणायचे, “ तुम्ही आहात ना.” ठरवले असते तर पत्रकारांना मिळणारे कोट्यातील घर काय शिवसेना सत्तेत असताना केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांना पोहचता आले असते. परंतु ते ठरवून या सगळ्यापासून लांब राहिले.

बदललेल्या पत्रकारितेमध्ये नैतिकतेने पत्रकारिता करणारे महत्त्वाचे मालुसरे पंढरीनाथ सावंत धारातिर्थी पडले, याचे आज मनस्वी दु:ख होत आहे. केईएमला शिकत असताना वेळ मिळेल तेव्हा साप्ताहिक मार्मिकच्या ऑफिसला जाऊन पंढरीकाकांना भेटणे आणि गप्पा मारणे हा माझा आवडता छंद होता. त्यानंतर वैजापूरला गेल्यावर माझी एकही मुंबईवारी पंढरीकाकांना भेटल्याशिवाय पूर्ण झाली नाही. काळाचौकीच्या रस्त्यावरील बैठ्या चाळीतील त्यांचे पत्र्याचे एका खोलीचे घर हा माझ्यासाठी एक वैचारिक राजमहल होता. त्यांच्या घरासमोरील ‘माय लॉन्ड्री’ चा मालक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फ्लोरा फाऊंटनला १०७ हुताम्यांपैकी एक कसा मारला गेला, असे अनेक किस्से त्यांच्या घरात शेजारी बसून मी ऐकले आहेत.

सामनामधील माझ्या ‘हे बोलायलाच हवं’ या स्तंभाचे पुस्तक निघाले. त्यावेळी पंढरीकाकांनी फोन केला आणि मागच्या पुस्तकाचे प्रकाशन मा. श्री. राज ठाकरेंच्या हस्ते झाले, यावेळच्या पुस्तकाचे प्रकाशन मा. श्री. उद्धव ठाकरेंच्या हस्ते करू, असं त्यांनी सांगून मी तारीख घेतोय, तु षण्मुखानंद हॉल बुक कर असा आदेश सोडला. त्यानंतर पुस्तक प्रकाशनाला स्टेजवर मा. श्री. उद्धव ठाकरे, श्री. रामदास कदम, श्री. मनोहर जोशी, श्री. दिवाकर रावते, श्री. संजय राऊत, श्री. सुभाष देसाई, श्री. सुनिल प्रभू असे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सर्व नेते माझे पुस्तक हातात घेऊन मंचावर उपस्थित होते. अशी होती पंढरीकाकांची किमया आणि प्रेम.

इतक्या थोर व्यक्तिमत्त्वाला शेवटच्या क्षणी हलाखीत जीवन व्यतित करावे लागले. माझ्या परिने शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांना जी काही मदत करू शकलो, त्याबद्दल माणूस म्हणून मला समाधान वाटते. शेवटच्या काही भेटींमध्ये पंढरीकाकांनी मला सांगितले होते की, “मी गेल्यावर आला नाहीस तरी चालेल, पण बाळासाहेबांनी मला त्यांच्या संग्रही असलेले दिलेले रूद्राक्ष आणि माझी सर्व पुस्तके मी तुझ्या नावावर करतो आहे. ती मात्र नंतर येऊन नक्की घेऊन जा.”

परवा मध्यरात्री पंढरीकाका झोपेतच चिरनिद्रेत गेले. जड ह्रदयाने मी ती पुस्तके घ्यायला जाईन पण तिथे पंढरीकाका नसतील हे सत्य पचवता येत नाहीए. माझ्यावर त्यांनी मुलासारखे प्रेम केले. त्यांची गेल्या १८ वर्षांची सोबत ही अनंत जन्मांच्या साथीसारखी होती. आज ती साथ सुटली, पण हे नातं कायम स्मरणात राहिल. पंढरीकाका तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली!

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaanadate@gmail.com


Tags:    

Similar News