फटाके फोडताना तरुणाचा मृत्यू ; पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील घटना

Update: 2021-11-05 13:07 GMT

पुणे :  सध्या देशभर दिवाळी (Diwali festival) सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील वाढत्या प्रदुषणाचा धोका लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली असताना राज्यात फटाके फोडताना अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला पेटता फटाका डोळ्याला लागल्याने हिंगोलीतील एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलाचा डोळा निकामी झाला होता.

तर पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वीस वर्षीय तरुणाला फटाके फोडत असताना, जवळील पत्रा उडून गळ्याला लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आसपासच्या लोकांनी संबंधित तरुणाला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे.

रोहन अनिल मल्लाव असं मृत तरुणाचं नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील काची आळी परिसरातील रहिवासी आहे. रोहन गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास काही मित्रांसोबत फटाके फोडत होता. यावेळी एक अ‍ॅटमबॉम्ब फुटला आणि त्याजवळ पडलेला पत्र्याचा एक तुकडा थेट रोहनच्या गळ्यावर येऊन आदळला. यात रोहन गंभीर जखमी झाला , शेजारील नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली.

Tags:    

Similar News