स्वानंद किरकिरे मराठी असल्याने त्यांच्या हिंदी अकादमीवरील नियुक्तीला आक्षेप
राजकारण्यांकडून भूमिपूत्र आणि परप्रांतीय असे मुद्दे कायम उपस्थित केले जातात. पण जर साहित्यिकांनीच मराठी आणि इतर भाषीक साहित्यिक किंवा लेखक असे मुद्दे उपस्थित करुन वाद घालण्यास सुरूवात केली तर?;
मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद राजकारण्याच्या अंगाने होत असल्याचे आपण कायम पाहतो. पण आता एका मराठी व्यक्तीला हिंदी अकादमीचे उपाध्यक्ष करण्याच्या निर्णयाला एका साहित्यिकानेच विरोध केला आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात नवीन वाद उभा राहिला आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने प्रसिद्ध हिंदी गीतकार, पार्श्व गायक स्वानंद किरकिरे यांना हिंदी अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. पण आता हिंदी साहित्यिक अशोक कुमार पांडेय यांनी आक्षेप घेतला आहे. पांडेय यांनी ट्विट करुन आपला आक्षेप नोंदवला आहे.
अशोक कुमार पांडेय यांचे म्हणणे काय आहे?
"हिंदी अकादमी में फ़िल्मी गाने लिखने वाले मराठी उपाध्यक्ष! ग़ज़ब का साहित्य प्रेम है भाई
@ArvindKejriwal
जी। मतलब आपको दिल्ली में रहने वाले इतने वरिष्ठ लेखकों में से कोई मिला ही नहीं! पहले एक चुटकुला लेखक फिर फ़िल्मी गीतकार! आप कमाल हैं सर!"
एवढेच नाही तर पांडेय यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात हिंदी अकादमीच्या उपाधअयक्षपदी महाराष्ट्रातीलच हिंदी लेखकांना नेमले जाते, मग दिल्लीमध्ये दिल्लीच्याच लेखकाला का नेमले गेले नाही?
पांडेय यांच्या भूमिकेमुळे ट्विटरवर यासंदर्भातला वाद निर्माण झाला आहे. पांडेय याच्या भूमिकेचे काही जणांनी समर्थन केले आहे, तर काहींनी विरोध केला आहे. यावर संदीप गुप्ता यांनी म्हटले आहे की, "दिल्लीत कुणी हिंदी लेखक उरलेच नाहीयेत असे दिसते आहे. केजरीवाल सरकारने मुंबईत राहणाऱ्या गीतकार स्वानंद किरकिरे यांना हिंदी अकादमीचे अध्यक्ष केले. ते मुळात मराठी आहेत आणि फक्त फिल्मी हिंदी गाणी लिहितात. स्वानंद किरकिरे यांचा दिल्लीशी काहीच संबंध नाही."