महागाई दरात घट झाल्याचा केंद्र सरकारचा दावा किती खरा आहे?

Update: 2022-08-17 13:55 GMT

महागाई कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. त्याचवेळी देशात अमूल, मदर डेअरीसह सर्व पॅकेटमध्ये दूध विकणाऱ्या दूध कंपन्यांनी लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. या दूध दरवाढीमुळे केंद्राचा महागाई कमी झाल्याचा दावा फोल ठरला आहे. देशात सध्या महागाईने जनता त्रस्त आहे. त्यातच आकडे येतात आणि जातात. वेगवेगळे दावे केले जातात. विरोधी पक्ष प्रतिकात्मक आंदोलन करतात. मात्र, सर्वसामान्य जनतेला दिलासा काय मिळत नाही.

महागाई कमी झाल्याचा केंद्र सरकारचा दावा आणि वस्तुस्थितीमध्ये मोठा फरक आहे. नवीन महागाई दरात खाद्यपदार्थ, तेल, फॅट आदींच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाईचा दर खाली आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. राजधानी दिल्लीचा बाजार असो की पुण्यासारख्या शहरातील बाजार असो भाज्यांचे भाव अजुनही गगनाला भिडलेले आहेत. एलपीजी सिलेंडर अजुनही 1 हजारांपेक्षा जास्तच आहे. त्यामुळं महागाई कमी झाल्याचे आकडे जनतेला फसवणारे आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

अलीकडेच, सरकारने पॅकेजमध्ये असलेल्या दूध, दही, पनीर, ताक इत्यादी दुग्धजन्य उत्पादनावर 5% जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यानंतर सरकारने खुल्या (पॅकेजमध्ये नसणाऱ्या) दुधावर जीएसटी लावलेला नाही. म्हणजेच जे शेतकरी खुल्या पद्धतीने दूध विकतात. ते जीएसटी घेणार नाहीत. मात्र, पॅकेजमध्ये दूध विकणाऱ्या कंपन्याना जीएसटीसह दूध विकणार. म्हणजे दूध कंपन्या जो नफा कमावतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही. मात्र, त्याच दुधाचे पॅकिंग आणि विक्री करणाऱ्या अमूल, मदर डेअरी, पराग, विटा, वेरका इत्यादी कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण वाढेल.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, 2021-22 मध्ये अमूलची वार्षिक उलाढाल 61,000 कोटींच्यावर पोहोचली आहे, ही आत्तापर्यत सर्वोच्च वार्षिक उलाढाल आहे. पॅकेज्ड दुधात अमूल ही भारतातील बाजारपेठेत आघाडीवर आहे. पॅकेज दुधाचा वापर शहरांमध्ये सर्वाधिक होतो. एकीकडे एप्रिल 2022 पासून 7 टक्क्यांच्या वर गेलेला महागाई दर खाली येत असल्याचा दावा करत भारत सरकार आनंदोत्सव साजरा करत आहे.

एसबीआयचे प्रमुख दिनेश खारा यांच्या मते, सप्टेंबर पर्यंत महागाईपासून दिलासा मिईल. कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असतील तर त्याचा परिणाम होईलच. एसबीआय प्रमुखांच्या या विधानाने कुणाला किती आनंद होईल हे माहीत नाही. मात्र, भारत सरकारचे आकडे काहीही असले तरी जनतेची महागाईपासून सुटका होत नसल्याचे वास्तव आहे.

महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ. ही वाढ जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत जनतेला महागाईपासून सुटका नाही. हे महागाई दर कमी झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या केंद्र सरकारला कोण सांगणार?

Tags:    

Similar News