अहमदनगर जिल्हातील कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात अकोले तालुक्यातील पेसा क्षेत्रात आदिवासी बांधवांचा आता मुक्त प्रवेशासाठी संघर्ष सुरू आहे. या अभयारण्याच्या प्रवेशद्वारच्या तपासणी नाक्यावर या स्थानिक आदिवासी बांधवांना विनकारण थांबवण्यात येते, तसेच वनविभाग कर्मचारी व ग्रामविकास वनसमितीच्या सदस्यांकडून प्रवेशासाठी वाहनशुल्क आणि प्रति व्यक्ती शुल्क घेण्यात येते. या अभयारण्य क्षेत्रातील गांवामध्ये जाण्यासाठी पावती घेण्याचा आग्रह या स्थानिकांना केला जातो. अनेकवेळा स्थानिक नागरिक व वन विभागाचे कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची वादविवाद देखील झालेले आहेत.
त्यामुळे या आदिवासी पेसा क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना ओळखपत्र देऊन या भागात निशुल्क प्रवेश देण्याची मागणी करण्यात येत आहे. जे पर्यटक तालुक्या बाहेरून अभयारण्य क्षेत्रात पर्यटनासाठी येत आहेत त्यांच्याकडून प्रवेश शुल्क घेण्यास हरकत नसल्याचेही या आदिवासी बांधवांनी स्पष्ट केले आहे. भारतीय ट्रायबल पार्टीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉली डगळे वनाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी केली आहे. या मागणीचा विचार न केल्यास तपासणी नाक्यासमोर बसून जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.