#MPSC : परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला- विजय वडेट्टीवार
MPSC परीक्षांच्या मुद्द्यावर राज्य सरकारचा घोळ पुन्हा समोर आला आहे.
राज्य सरकारने MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्नंतर या निर्णयाविरोधात राज्यभरातील MPSCच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरुन उतरून विरोध केला आहे. पण आता या घोळाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी ट्विट करुन याबाबत खुलासा केला आहे. " माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल."
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतरच घेतला गेला असे स्पष्टीकरण MPSC तर्फे देण्यात आले आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने लेखी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले असे MPSCचे म्हणणे आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पण एकूणच या संपूर्ण मुद्द्यावर सरकारी पातळीवर गोंधळ समोर आला आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यातून आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सांगली, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, बुलडाणा, नाशिक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. पुण्यातील आंदोलनात भाजपचे नेते गोपीनाथ पडळकर सहभागी झाले आणि त्यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
दरम्यान महाविकास आघाडीतच या निर्णयावरुन मतभेद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार घ्याव्या अशी मागणी केली आहे, त्यांनी ट्विट करत, यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट् न थांबता कोरोनाचे नियम पाळून पुढे जावे लागेल.