नवी दिल्ली : दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात वकिलाच्या चेंबरमध्येच एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी वकिलांनी चेंबर उघडले तेंव्हा त्यांना एका तरुणाचा मृतदेह चेंबरमध्ये आढळला.
मृत तरूण कोर्ट परिसरातल्या वकिलांच्या चेंबरमध्ये रात्री झोपायचा. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणाचा मृत्यू अंमली पदार्थ सेवन केल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. मात्र, न्यायालयाच्या परिसरात अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या वकिलांनी चेंबर उघडले आणि हा प्रकार समोर आला. मनोज असे मृताचं नाव आहे. तो 35 वर्षांचा होता. या घटनेची माहिती तीस हजारी बार असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना आणि मृतकाच्या ओळखीच्या लोकांना देण्यात आली. मनोज मूळचा बिहारचा असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सांगितले की, "पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तपास पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृताच्या शरीरावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. अंतर्गत दुखापत असेल तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळेल. त्यामुळे मृत्यूच्या तूर्तास मृत्यू ठोस कारण सांगता येणार नाही.