उस्मानाबाद : मागील पंधरवाड्यापासून भाजीपाल्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. एकीकडे खतांचे, बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे शेती मालाला भाव नाहीत, त्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचा लागवड खर्च पण निघत नाही.दुधाचे देखील दर प्रचंड कोसळले आहेत , त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
आधीच कोरोनाने हैराण शेतकरी आता शेती मालाला भाव मिळत नसल्याने दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने भाजीपाल्याला प्रती किलो १० रुपये व हेक्टरी १ लाख रूपये अनुदान द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. हिच मागणी घेऊन स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो व हिरवी मिरची टाकत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.