बिहार : भाजपचा 'शब्द' आणि शिवसेनेचे चिमटे
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकार स्थापन केले आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. फडणवीस यांच्या या टीकेला सामनाच्या अग्रलेखातून जोरदार उत्तर देण्यात आले आहे.;
बिहारमध्ये भाजपने दिलेला शब्द पाळत नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले आहे. पण नितीशकुमार किती दिवस मुख्यमंत्री राहतील असा सवाल विचारत शिवनसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपला चिमटे काढण्यात आले आहेत. या अग्रलेखात काय म्हटले आहे ते पाहूया...
बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विजयाचा उत्सव साजरा करीत आहेत ते 'भाजप'वीर दुसऱ्या क्रमांकावर आणि तेजस्वी यादवांचा 'राजद' पहिल्या क्रमांकाचा शिलेदार आहे,पण दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखालीच पुढचे दिवस ढकलावे लागतील या चिंतेने नितीशकुमारांच्या चेहऱयावरचे तेज उडाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, ''नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला होता, तो पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे.'' महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात. गंमत अशी की, बिहारचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करीत आहेत. या ढोंगास काय म्हणावे! बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत.
नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. मागच्या सरकारात भाजपचे सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश यांचे ते खंदे पाठीराखे होते. यावेळी भाजपने नितीशकुमारांचा हा पाठीराखा घरीच बसवला आहे. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री तर केले नाहीच, पण जास्त आकडय़ाच्या जोरावर भाजपने एक सोडून दोन-दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत. त्यामुळे नितीशकुमारांची डोकेदुखी वाढणार आहे. महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुडय़ा सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळय़ांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे. नितीशकुमार हे नामधारी मुख्यमंत्री असतील व एक दिवस ते इतके अपमानित होतील की, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल.
भाजपच्या कर्तबगारीची ही कमालच म्हणावी लागेल किंवा फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे मोदी साहेबांचे बिहारवर विशेष प्रेम आहे. ते आता स्पष्टच दिसते. महाराष्ट्रात भाजपच्या जागा जास्त निवडून आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही, पण बिहारात तिसऱया क्रमांकावर घसरलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाचा मुकुट बहाल केला. काय हे औदार्य! राजकारणातल्या या त्यागाचे वर्णन करायला शाई अपुरी पडेल.
बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल. नितीशकुमारांना आमच्या शुभेच्छा