सायरस पुनावाला यांना भारतरत्न द्या, खासदार श्रीकांत शिंदे यांची पंतप्रधानांकडे मागणी

Update: 2021-12-17 12:23 GMT

कोरोनावरील लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटचे सायरस पुनावाला यांना भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी केली आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील लस तयार करुन कोट्यवधी लोकांचा प्राण वाचवले आहेत, त्यामुळे त्यांचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सायरस पुनावाला यांना याआधी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

काय आहे सिरम इन्स्टिट्यूट?

सिरमची कंपनीची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली होती. 1960 च्या दशकात भारत आणि दक्षिणेतील देश (मुख्यतः आशिया आणि आफ्रिका) हे लशींसाठी पाश्चिमात्य देशांवर अधिक अवलंबून होते. त्यामुळे या देशांतील नागरिकांचे आयुर्मानही कमी होत होते. अशा परिस्थितीत या विकसनशील आणि अविकसीत देशांमध्ये परवडणाऱ्या किंमतीत लशी उपलब्ध होण्याची गरज होती. अशातच 1966 मध्ये सिरमची स्थापना झाली आणि या राष्ट्रांना मोठा दिलासा मिळाला.

सिरम इन्स्टिट्यूटचे कार्य

जगातील पाचपैकी तीन मुलांना सिरमने उत्पादित केलेली लस दिली जाते. लशींच्या माध्यमातून सिरमकडून जगातील दोन तृतीयांश लोकांचं संरक्षण केले जाते. आज, डोसच्या संख्येनुसार सिरम ही लसींची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे. सिरममध्ये जीवनरक्षक लशींचे वर्षाला 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करण्यात येतात. 170 देशांमध्ये या लशींचा पुरवठा सिरम करते. पुनावालांनी सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशा किमतीत लस उपलब्ध केल्या आहेत. सिरमच्या काही लशींची भारतात ५ रुपये इतकी किंमत आहे. भारतासहीत उझबेकिस्तान, लाओ लोकशाही प्रजासत्ताक, नेपाळ अशा देशांना विविध आजारांवरील लाखो लशी पुनावालांनी मोफत उपलब्ध करून देतात.

पुनावाला यांना पद्मश्री पुरस्कारासह, देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांकडून व देशांकडून सिरम गौरविण्यात आले आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम सुरू करून लोकहितासाठी देखीर सायरस पुनावाला यांनी काम केले आहे.

Tags:    

Similar News