कोल्हापूर - कोल्हापूरमधील प्रयाग चिखली येथे पंचगंगा नदीमध्ये दुर्मिळ ॲलिगेटर जातीचा मासा सापडला आहे. किशोर जगन्नाथ दळवी आणि रघुनाथ दळवी यांना मासेमारी करतांना हा मासा सापडला आहे. या दोघांच्या जाळ्यात हा ॲलिगेटर जातीचा मासा अडकला. पंचगंगा नदीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा मासा सापडल्याने आश्चर्च व्यक्त केले जात आहे. ॲलिगेटर मासा अमेरिकेतल्या गोड्या पाण्यात आढळून येतो. मात्र पहिल्यांदाच या भागात या जातीचा मासा आढळला आहे.
शुक्रवारी सकाळी प्रयाग चिखली येथील किशोर जगन्नाथ दळवी आणि रघुनाथ दळवी आणि काही शेतकरी नेहमीप्रमाणे पंचगंगा नदीमध्ये जाळे टाकून मासे पकडत होते. मात्र त्यांच्या जाळ्यात पहिल्यांदाच अमेरिकेत आढळणारा हा दुर्मिळ जातीचा 'ॲलिगेटर' मासा सापडला आहे. माशाचे तोंड सुसरच्या तोंडासारखे दिसत असल्याने त्यांना सुरुवातीला मगरच जाळ्यात अडकली असे वाटले. मात्र त्याचे बारीक निरीक्षण केल्यानंतर हा वेगळाच मासा असल्याचे लक्षात आले. काही जाणकारांना या माशाविषयी विचारल्यानंतर हा मासा 'ॲलिगेटर' जातीचा असल्याचे समजले. दरम्यान, पहिल्यांदाच असा मासा सापडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून पंचगंगा नदीमध्ये आणखी असे अनेक वेगळे मासे असण्याची शक्यता व्यक्त होते आहे.