प्रहार जनशक्ती पार्टीच्या बदलापुर शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा ; 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

Update: 2021-11-10 03:27 GMT

उल्हासनगर :  बदलापूर पालिकेच्या ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रहार जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांचाही समावेश आहे. मात्र, अविनाश सोनवणे यांनी ठेकेदाराचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आपल्याला यात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

विश्वास जामघरे असं या ठेकेदाराचं नाव आहे, त्यांनी कोरोना काळात बदलापूर पालिकेला सुरक्षारक्षक आणि ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचा ठेका घेतला होता. मात्र, कामात त्रुटी असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पार्टीचे बदलापूर शहराध्यक्ष अविनाश सोनावणे यांनी माहितीच्या अधिकारात पालिकेकडून या कामाची माहिती घेत, आपल्याला ब्लॅकमेल करून २५ लाखांची खंडणी मागत असल्याचा आरोप विश्वास जामघरे यांनी केला.

तडजोड करत शेवटी १० लाखांची मागणी सोनावणे यांनी केली आणि खंडणी मागत आपल्याला मानसिक त्रास दिला, असा आरोप करत जामघरे यांनी B ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने अविनाश सोनावणे यांच्यासह अमोल सोनवणे, विशाल गायकवाड आणि संजय कदम यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी ठेकेदार विश्वास जामघरे यांनी केली आहे.जामघरे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानेच आपल्याला गोवण्यात आले असुन, आम्हाला अडकवण्यात आल्याच अविनाश सोनावणे यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात आपण न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर आपल्याला जामीन मिळाल्याचही अविनाश सोनावणे यांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News