नितिन गडकरींनी सांगूनही कंत्राटदाराने काम वेळेत पूर्ण केलं नाही, कारवाई होणार का? - विवेक वेलणकर
सजग नागरिक मंच चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. या पत्रात देहूरोड सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचं काम वळेवर पूर्ण न झाल्याने सदर कंत्राटदारावर कारवाईची मागणी वेलणकर यांनी केली आहे. काम समाप्तीच्या मूळ अपेक्षित तारखेला जवळपास साडेआठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही कंत्राटदाराला पुन्हा एकदा मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गडकरी यांनी या रस्त्यासंदर्भात स्वत: आश्वासन दिलं होतं. तरीही काम पूर्ण न झाल्यानं NHAI च्या अधिकाऱ्यावर व टोल कंत्राटदारावर कारवाई करावी. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
मा. महोदय,
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम 1 आँक्टो. 2010 रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम 31 मार्च 2013 पर्यंत संपणे अपेक्षित होते. मात्र, काम अद्याप सुरूच आहे. आपल्या मंत्रालयाच्या अधिनस्थ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही.
या अपूर्ण कामामुळे गेल्या 11 वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले. डझनावारी निष्पाप नागरिकांचा बळी गेला. वाहतूक कोंडी मुळे हजारो कोटी रुपयांचे बहुमुल्य इंधन वाया गेले आणि लक्षावधी नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले. मात्र. याची खेदखं त ना कंत्राटदाराला ना NHAI ला. निर्लज्ज पणाची कमाल अशी की NHAI दरवर्षी इमानेइतबारे कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. NHAI ने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटीसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत, service road अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही आणि जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे. हा टोल रोड असल्याने या संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे. ज्यावर NHAI ने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, आज या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत.
गडकरी साहेब, आपणसुध्दा सदरहू कंत्राटदाराला गेल्या सात वर्षात दोन तीन वेळा दम दिला आहे. NHAI स्वतः पैसे ओतून मार्च २०२१ अखेरपर्यंत काम पूर्ण करेल असेही आपण जाहीर केले होते. आज रोजी उडृडाणपुलांसकट रस्त्याची अनेक कामे प्रलंबित आहेत. आपण परवाच या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा असे आदेश देऊनही परत एकदा NHAI ने या कामाला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आपणास विनंती की आपल्या जाहीर आश्वासनाला केराची टोपली दाखवून अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण न करणार्या NHAI च्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी आणी गेली अकरा वर्षे या अपूर्ण कामाचा त्रास सहन करणा-या वाहनचालकांना दिलासा म्हणून काम पूर्ण होईपर्यंत या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी.
आपल्या सक्रीय प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,
विवेक वेलणकर -- अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे