पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा संसदेला घेराव घालण्याचा इशारा
ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात पंतप्रधान मोदींनी माघार घेतली. पण आता पुन्हा एकदा देशातील एका मोठ्या संघटनेने संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे, विशेष म्हणजे हा इशारा पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी दिला आहे.;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी रेशन वितरकांबाबतच्या भारत सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऑल इंडिया रेशन वितरक संघटना गेल्या काही वर्षापासून त्यांच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे निवेदन देत आहेत. मात्र, या निवेदनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने रेशन वितरक देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती प्रल्हाद मोदी यांनी दिली आहे. प्रल्हाद मोदी हे रेशन वितरक आहे. त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली. केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास संसदेला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने रावबलेले रेशनिंगचे मॉडेल देशभरात राबवावे अशी मागणी ऑल इंडिया रेशन वितरक संघटनेने केली आहे. मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी या संघटनेचे पदाधिकारी आहेत.
कधी होणार आंदोलन?
4 जुलै - तालुका स्तर आंदोलन
11 जुलै - जिल्हा स्तर आंदोलन
18 जुलै - राज्यांच्या राजधानीत आंदोलन
2 ऑगस्ट - राजधानी नवी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलन होणार
काय आहेत मागण्या?
धान्य वितरकांचे कमिशन वाढवावे
रेशन वितरकांना LPG गॅस आणि खाद्यतेल वितरण करण्याची परवानगी देण्याची मागणी
पश्चिम बंगाल रेशन मॉडेल देशभर राबवावे
तांदूळ, गहू, साखर विक्रीवर योग्य कमिशन द्या
वितरक लोकांनी कोरोना काळात काम केलं, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी
कोरोनामध्ये बळी गेलेल्या रेशन वितरकांच्या कुटुंबियांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मदत करावी.