निसर्गकन्या कवयित्री बहिणाई

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या काव्यसंग्राराहाचं सात प्रकारे वर्गीकरण करता येतं. निसर्ग, सामाजिक, आध्यात्मिक, वर्णनात्मक, जीवनतत्त्वज्ञान, स्फूट ओव्या आणि म्हणी अशा सर्व मिळून 116 रचना उपलब्ध असून त्या 'बहिणाईची गाणी' या पुस्तकात समाविष्ट झाल्या आहेत, बहिणाई स्मृती संग्रहालय, समन्वयक अशोक चौधरी यांनी या लेखातून प्रकाश टाकला आहे.;

Update: 2024-02-05 07:02 GMT

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या गाण्यांची सोपनदेवांनी लिहून ठेवलेली वही वाचून आचार्य अत्रे म्हणाले होते, "शेतात सापडलेला मोहरांचा हंडा!," कुणी म्हणालं, अपूर्व चमत्कार, जडावाचा तीन पदरीहार, तर कुणी त्यांना आदरपूर्वक विशेषणं बहाल करावी - भूमिकन्या, खान्देशकन्या, निसर्गकन्या.

कान्हदेशातील ज्या काळ्याशार भूमीत बहिणाई रसरशीत अंकुरासारख्या रुजल्या, वाढल्या. कान्हदेशातील या मायमातीनं, शेतीशिवारानं, पिकपाण्यानं, सभोवतालच्या परिसरातील जग-रहाटीनं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. मायमातीचं सत्त्व आणि सृजनशील तत्त्व बहिणाईंवर संस्कारित झालं. कणखरता मृदुसोशिकता, क्षमाशीलता आणि विलक्षण जागरूकता म्हणजे बहिणाई. बहिणाईचं नात निसर्गाशी कसं अतूट होतं ते त्यांनी रचलेल्या ओव्यांवरून जाणता येईल.

एकेदिवशी अप्पा म्हणजे बहिणाईंचे सुपुत्र सोपानदेव म्हणाले," आई तुले एक विचारू, दिवसभर किती कष्ट करते? जीव जाळणाऱ्या या उन्हात शेतावर राबराब राबते, पण तुही नजर सतत जमिनीकडे, मं तुले आमच्या पेक्षा हे वेगळे विचार सुचतात तरी कसे?" यावर बहिणाई म्हणते, "धरत्रीच्या आरशामधी मी सरग (स्वर्ग) पाहते बापा!" अशीच दुसरी आठवण सोपानदेव सांगतात. आमच्या मळ्यात विहिरीमागे एक आंब्याचे झाड आहे. विहिरीच्या धावेवर एक गुलमोहराचं झाड होतं. एकदा त्यांचा पुतण्या तिला म्हणाला, "गुलमोहराच्या झाडाचा काय उपयोग? या झाडाला फळे नाहीत, ना पोट भरे ना ओठ भरे!" त्यावर आई म्हणाली, "आंब्यानं पोट भरत असेल. त्याच्या झाडाची सावलीही मिळत असेल पण या गुलमोहराच्या झाडानं डोळ्यांना सुख मिळतं आणि मनही भरतं." हे मन भऱ्याचं झाड आहे. हे झाड ज्यावेळी वीज पडून भस्मसात झालं त्यावेळी बहिणाई रात्रभर शोक करीत बसल्या होत्या. आनंदयात्री पु ल. देशपांडे यांच्याही संस्कारशील विचारांची अशावेळी आठवण येते, कारण आयुष्याच्या वाटचालीत सगळंच पोट भरण्यासाठी नसतं, काही मनाला आनंद देणारं, वेगळी अनुभूती देणारंही असतं.

कोणत्याही मायमाउलीचा पदर संस्कृतीला समृद्धता देणारा असतो. काही मायमाउली निसर्गाच्या निरीक्षणातून आणि आपल्या वाट्याला आलेल्या जीवनातील अनुभवातून असं काही विश्व साकारतात, की त्यातून संस्कृतीची एक प्रगल्भ वाट निर्माण होते. इथं लौकिक अर्थानं चार भिंतींच्या आत प्राप्त होणा-या शिक्षणाची अट शिल्लकच राहत नाही. भल्या भल्या पदव्या घेऊन ज्यांना एवढं, साधं, तरल आणि संवेदनशील भावविश्व मांडता आलं नाही, ते भावविश्व निसर्गकन्या बहिणाई संवेदनशील मनानं, चित्रदर्शी भाषाशैलीत अगदी सहजतेनं साकारतात.

येहेरीत दोन मोटा

दोन्हीमधी पानी एक

मोट हाकलतो एक

जीव पोसतो कितीक?

बहिणाईच्या या साध्या सरळ ओळी जगण्याला भान देऊन जातात. विहिरीच्या मोटेचं गाणं, पाणी उचलताना मोटेच्या चाकाचा सभोवतालच्या वातावरणात घुमणारा आवाज, मोटेचा नाडा, कणा या गोष्टी आजच्या पिढीला कशा उमजणार? जिथं मोटेचं चित्रही धड रेखाटता येणार नाही तिथं... तिचं भावविश्व चुलीवरच्या भाकरीपासून, पाखराच्या घरोट्यापर्यंत, ऊन-वाऱ्यापासून पानांच्या टाळ्यापर्यंत, कडू निंबोणीपासून गोड बोलीपर्यंत मनात रुंजी घालतं आहे. बहिणाई शेतात राबल्या होत्या. शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दुःखं, त्यातले चढउतार, झाडं, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती, पर्यावरण जिव्हाळा त्यांच्या काव्यातून दिसून येतो. त्यांना दिसणारा देवही निसर्गातच दिसतो.

तुह्या पायांची चाहूल

लागे पानापानामधी!

देवा तुह्यं येनं जानं

वारा सांगे कानामधी!

माह्यासाठी पांडुरंगा

तुझ्यं गीता भागवत

पावसात समावतं

माटी मधीं उगवतं !

बहिणाबाईंच्या काव्यसंभाराचं सात प्रकारे वर्गीकरण करता येतं. निसर्ग, सामाजिक, आध्यात्मिक, वर्णनात्मक, जीवनतत्त्वज्ञान, स्फूट ओव्या आणि म्हणी अशा सर्व मिळून 116 रचना उपलब्ध असून त्या 'बहिणाईची गाणी' या पुस्तकात समाविष्ट झाल्या आहेत, बाकी इतर रचना गहाळ झाल्याचं सोपानदेवांनी नमूद केलं आहे.

शाळेत जाऊन पाठ्यपुस्तकी शिक्षण न घेतलेल्या, अक्षर ओळख नसलेल्या, मौखिक परंपरेनं आत्मसात केलेल्या गोष्टी, भोवतालच्या निसर्गाचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि जीवन जगताना प्रत्यक्ष घेतलेले अनुभव यातून त्यांना जे जे सूचलं ते ते अनमोल साहित्य झालं, मराठीचं धन झालं. लेवा पाटीदार बोलीभाषेचं तेजस्वी वैभव वाचकांसमोर आलं. आपल्या कवितांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान बहिणाईंनी सांगितलं आहे. दुसऱ्यासाठी कष्ट घेणं, झिजणं, यासाठीच आपलं जगणं असतं हे बहिणाईंना भोवतीच्या निसर्गातील रूप+स्वरूपात दिसतं.

उभे शेतामधी पिकं

उन वारा खात खात,

तरसती कव्हा जाऊ

देवा, भुकेल्या पोटात ।

ऊन, वारा, पाऊस खात शेतात पिकं उभी असतात. कशासाठी? तर भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे, असा मनातल्या मनात ही पिकं देवाचा धावा करीत असतात

पाहीसनी रे लोकांचे

यवहार खोटे नाटे

तव्हा बोरी बाभयीच्या

आले आंगावर काटे।

बोरीबाभळींच्या अंगावर माणसांच्या खोट्या व्यवहारांनी काटे आले आहेत. त्या आता राखणीसाठी शेतांच्या कुंपणावरच्या अणकुचीदार काट्या झाल्या आहेत हे बहिणाईंनी नमूद केलं आहे.

बहिणाई खेड्यात वाढल्या. शेतात राबल्या. वतनदारी श्रीमंतीपासून ते गरिबीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांना व्यवहारज्ञानच शिकवून गेला. खेड्यातल्या जीवनचक्राशी त्या एकरूप झाल्या. नाती सांभाळली. कुटुंब, माणसं, निसर्ग, शेतकऱ्यांबरोबरच शेतातील अवजारं, कोयपं, आऊत, पाभर (तिफण), चाहूर, वखर, नांगर ही सुद्धा त्यांच्या चिंतनातून सुटली नाहीत. त्यांच्या शेतातल्या अनुभवावरून दररोजच्या जगण्यातील वास्तव आणि निसर्ग, शेती, पाणी, प्राणी, माणूस, देव यांच्यातील ताळमेळ कसा आहे, तो कसा असायला हवा? याचं गणित त्या आपल्या भावविश्वानुसार, दृष्टीनुसार मांडतात. सरत्याला पेरतं करणं, तिफणी नं मातीशी करार करणं, पेरणीचा चौघडा वाजवीत बीज मातीच्या कुशीत टाकणं, पेरलेल्या बी-बियाण्यांवर मायेची शाल पांघरणं शेतातल्या प्रक्रियेची ही जडण-घडण त्यांच्या कवितेत दिसून येते.

धरित्रीच्या कुशीमधी, बी-बियानं नीजली,

वर पसरली माती, जशी शाल पांघरली ।

बीय टरारे भूईत, सर्व कोंब आले वन्हे,

गयरलं शेत जसं, आंगावरती शहारे ।।

बहिणाबाईंनी केलेली शेतीची वर्णनं जणू शेती प्रक्रियेची संपूर्ण माहितीच करून देत आहेत असं वाटतं. पेरणी नंतर आलेला पाऊस शेतक-याला किती आनंद देऊन जातो. हा पाऊस बहिणाईना देवाचा प्रसादच वाटतो. त्यानंतर उगवलेलं कोवळं पीक जणू त्यांची कविता बनतं.

ऊन वा-याशी खेयता

एका एका कोंबातून

पर्गटले दोन पानं

जसे हात जोडीसन

टाया वाजविती पानं

दंग देवाच्या भजनी

बिजांकुरातून उगवलेली कोवळी दोन छोटीशी पान बहिणाईंना दोन इवलेसे हात वाटतात, तर वर आल्यानंतर हलणारी पानं जणू टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताहेत. देवाची प्रार्थनाच करताहेत. देवाचं स्मरण करताहेत. अशीच आबादीआबाद होऊ दे म्हणून मागणं मागताहेत. या निर्मितीमागचं आणि निसर्ग नियमांचं गूढ त्यांना विचार करायला लावतं. शेतात बी पेरल्या पासून ते पीक व्यवस्थित हाती येईपर्यंत, शेतक-याचे कष्ट वाया जायला नकोत ही काळजी त्यांना वाटते.

आता लागे मार्गेसर .

आली कापनी कापनी.

आज करे खालेवहे,

डाव्या डोयाची पापनी.

आज डावा डोळा लवतोय, काही संकट तर येणार नाही नं? पिकं कापणीच्या वेळी त्यांना असा विचार येऊन त्या हातातल्या विळ्याशी बोलतात. "आता विळ्या रे बाबा, दाखव तुझी करामत". अशा प्रकारे त्या अवजारांशी बोलतात, कधी वा-याशी बोलतात. बैलांशी बोलतात. असा सगळ्यांशी संवाद साधून एकेक काम हातावेगळं करतात. मराठी भाषेतील ही सजीव सृष्टी इथं डोळ्यांसमोर साक्षात साकार होते. मातीवर बहिणाईचं जीवापाड प्रेम आहे, धरित्रीबद्दल त्यांना अत्यंत आदर. धरित्रीच आपली खरी माय आहे. परंपरेनं मिळालेलं देणं आहे असं त्यांना अंतःकरणापासून वाटत असे. रानावनात जीव रमणाऱ्या या कवयित्रीच्या नजरेतून सुगरणीचं घरटं कसं सुटेल?

पिलं निजली खोप्यात, जसा झुलता बंगला, तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला ।

शेतीची कामे करता करता बहिणाईंच्या डोळ्यापुढे माहेराची वाट दिसू लागते. माहेराची वाट सर्व स्त्रियांच्या माहेरच्या वाटेप्रमाणे मखमलीची आहे, पण वेगळेपणा पुढेच आहे. त्या वाटेवर लौकी ही छोटी नदी आहे. वाटेवर पानांचे मळे आहेत. रेल्वेचं फाटक आहे. बाभळीचं बन आहे. पायाखालची माती तर पिवळी पिवळी अशी चिक्कण माती आहे.

माह्या माहेराच्या वाटे

'लौकी' लागली लागली

वाटच्या रे वाटसरा

तुह्यी तहान भागली

बहिणाईंना माहेराहूनही आपली कर्मभूमी आपली काळी आई धरित्री अधिक प्रिय आहे. बहिणाईंची 'धरित्रीला दंडवत' ही कविता तर धरित्रीचं जणू स्तोत्रच आहे.

'अशी धरत्रीची माया, अरे, तीले नही सीमा ।

दुनियाचे सर्वे पोटं, तिच्यामध्यी झाले जमा' ।।

अशा या धरित्रीला दंडवत घालणं हे त्यांच्या रक्तातच आहे. आपल्या जीवाभावाच्या सखीला, धरित्रीला त्या विचारतात,

सांग सांग धर्तीमाता, अशी कशी जादू झाली?

झाड गेलं निंघीसनी, मांघे सावली उरली ।

तेराव्या वर्षी लग्न, तरुणपणीच तिशीत आलेलं वैधव्य आणि या अल्पशा आयुष्यात आलेली नैसर्गिक संकटं यांना समजून घेत त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहत त्यांना सामोऱ्या गेल्या. शेता- शिवारातील झाडांशी वृक्ष-वल्लरींशी बहिणाईंची फार मैत्री होती. आवडणाऱ्या झाडांना तिनं नावं ठेवली होती. गुलमोहराला 'फुलाजीबोबा' फुलाजीमहाराज. खिरणीला दुभती, निंबाला निंबाजीबोवा, केळीच्या घडाला 'लेकरं कडेवर घेऊन उभी! कशी माझी लेकुरवाळी रंभा' या प्रकारे निसर्गातील हा तिचा मोठा कबिला होता.

किती रंगवशी रंग,

रंग भरले डोयात

माह्यासाठी शिरीरंग

रंग खेये आभायात

निसर्ग आणि माणूस त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. देवाला किंवा दैवाला दोष न देता आयुष्याचा अर्थ शोधण्याची त्यांची धडपड होती.

बहिणाईंनी ३ डिसेंबर १९५१ रोजी या धरत्रीचा निरोप घेतला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार त्यांच्याच शेतात म्हणजेच जाममळ्यात, मळ्यातील तिची मैत्रीण दुभती (खिरणी) ती देखील आता वाळली होती, तिच्या समोरच दहन करण्यात आले.

तात्पर्य बहिणाईंची कविता जीवन मूल्यांसह आणि निसर्गाला संवेदनांसह स्पर्श करणारी श्रेष्ठ, दर्जेदार रचना आहे, आणि म्हणूनच या गुणसंपदेचा विचार करता अभिमानाने सांगावसं वाटतं की ही कविता एका निसर्गकन्येची, भूमिकन्येची मौलिक कविता आहे. मराठी भाषा, साहित्य संस्कृती संवर्धनासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा-या आदरणीय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो.

अशोक चौधरी

समन्वयक, बहिणाई स्मृती संग्रहालय, चौधरीवाडा, जळगाव, bcmt@jains.com

Tags:    

Similar News