वक्फ बोर्डाच्या गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) गुरुवारी पुण्यात सात ठिकाणी छापे मारत कारवाई केली आहे. त्यानंतर या कारवाईवर प्रतिक्रिया देत एमआयएमचे खासदार आणि वक्फ बोर्डाचे सदस्य इम्तियाज जलील यांनी 'आगे आगे देखो....',असा सूचक इशारा दिला आहे.
जलील यांनी ट्विट करत म्हंटले आहे की,' ज्यांना वाटले की महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाच्या जमिनी सहज गिळंकृत केल्या जाऊ शकतात, त्यांच्यासाठी ही फक्त सुरुवात आहे. आज वक्फ जमीन घोटाळ्यात आठवी एफआयआर नोंदवली याचा आनंद आहे. नवीन वक्फ बोर्ड स्थापन झाल्यापासून काही महिन्यांत या सर्व 8 एफआयआर नोंदवल्या गेल्या. आगे आगे देखो..,' असा सूचक इशारा सुद्धा जलील यांनी दिला आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात झालेल्या घोटाळ्यातील जरीफ खान आणि त्याच्या साथीदारांनी बोगस ट्रस्ट स्थापन करून बोर्डाच्या जमिनीच्या बदल्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी पुण्यात 'ईडी'कडून झाडाझडती घेण्यात आली. नाना पेठेत मोठ्या पोलीस बंदोबस्तात छापेमारी करण्यात आली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.