आमदार प्रणिती शिंदेचं भाजपला चॅलेंज
कॉंग्रेसने आजवर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु ,आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद निश्चितपणे दाखवू ,असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांना दिला.;
कॉंग्रेसने आजवर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु ,आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद निश्चितपणे दाखवू ,असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांना दिला. 'कॉंग्रेस मनामनात,कॉंग्रेस घराघरात' या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.
सोलापुरातील उत्तर कसबा परिसरातून 'कॉंग्रेस मनामनात,कॉंग्रेस घराघरात' या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते. परंतु , शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी आणले. उजनी, उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिम्मत दुसरी पाईपलाईन आणण्याची. किती वर्षे आम्ही दुहेरी पाईपलाईनचे नाव ऐकतो. त्यांचे दोन मंत्री, एक खासदार असतानाही त्यांना ते जमले नाही. भाजपला मी चॅलेंज करते, केंद्रात त्यांची सत्ता असून मोदीबाबा पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे, असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिले.
केंद्र सरकारने हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात दिले असते, तर एवढी लोकं मेली नसती. त्यांच्या मृत्यूला केवळ पंतप्रधान मोदी हेच जबाबदार आहेत, असा हल्लाही शिंदे यांनी चढविला.