केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत आहे हे हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते- थोरात
पाथर्डी : केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार सरकारी स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करत आहे तसेच भारतीय जनता पार्टीचा जनाधार असे म्हणणे केवळ नौटंकी असल्याचा घणाघात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले की,सत्ता न आल्याने भाजपमध्ये एकप्रकारे नैराश्य आलं असून, शिवसेना आपल्यापासून दूर का गेली याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. महाविकास आघाडी सरकार आज पडेल उद्या पडेल असं ते म्हणत आहेत मात्र असं काहीही होणार नाही महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, याही पुढे आम्ही एकत्रित राहणार असून, केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत आहे हे हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते असे मंत्री थोरात म्हणाले.
सोबतच ओबीसींवर भाजप अन्याय करत आहे कारण , केंद्राकडे असलेल्या इम्पिरीकल डेटा त्यांनी दिला तर हा प्रश्न सहज सुटेल मात्र, केंद्रातील भाजप सरकार तसं करायला तयार नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींवर भाजप अन्याय करत आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
सोबतच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे उत्तम काम सुरू आहे, नुकतंच त्यांनी विधासभेसाठी महिलांना 40 टक्के जागा देण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असून त्यामुळे एक वेगळी दिशा मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घालून चिरडण्याचा जो प्रकार केला तो अतिशय निंदनीय असून त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भाजप विरोधात तीव्र रोष आहे असं थोरात म्हणाले.