MaxMaharashtra Impact : 33 बेघर कुटूंबांना मिळणार शासकीय ओळख
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे जव्हार तालुक्यातील आदिम 33 कातकरी कुटूंबाकडे शाकीय ओळखच नसल्याची धक्कादायक बाब मॅक्समहाराष्ट्राने चव्हाट्यावर आणल्या नंतर प्रशासन खडबडून जाग झाले आहे.
जव्हार पासून 16 किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतमधील आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाडयात 150 घरांची लोकवस्ती आहे. या पाड्यावरील लोकसंख्या 637 आहे. तर कातकरी समाजाची 55 घरे असून 230 लोकसंख्या आहे. यावेळी मॅक्स महाराष्ट्रने दशरथ तुळशीराम जाधव वय 26 वर्ष यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. त्याच्या कुटूंबात आई, पत्नी, एक बहीण आणि 3 मुली असा परिवार आहे. पण या कुटुंबाकडे स्वतःची शेती नाही, आठ महिने स्थलांतरित होऊनच हे कुटूंब उदरनिर्वाह करत आहेत.
यावेळी धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे या कुटूंबियांकडे मतदान कार्ड, रेशनकार्ड, जॉबकार्ड, जातीचा दाखलाच काय तर कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. यामुळे कोणत्याच योजना या कुटुंबापर्यंत पोहोचत नाहीत. बरं हे एकच कुटुंब असे आहे असे नाही तर अशी 33 कुटूंब तिथे आहेत ज्यांच्याकडे अद्यापही कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. त्यामुळे हे लोक बेघरच आहेत. परंतु हे भयाण वास्तव मॅक्समहाराष्ट्राने समोर आणल्या नंतर या धोंडपाड्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली. यानंतर या बेघर वंचित कुटूंबाना लवकरच आम्ही आवश्यकतेनुसार जॉब कार्ड, रेशनकार्ड, जातीचे दाखले, मतदान कार्ड यासारखे शासकीय कागदपत्रांसह बेघरांना घरकुले मंजूर केली जाणार असल्याचे प्रांत अधिकारी आयुषी शिंग यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले.
त्यामुळे मॅक्स महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल घेत 33 बेघर कातकरी कुटूंबियांना शासकीय ओळख मिळणार असल्याचे दिसून येत आहे.