लॉकडाऊनचा नियम मोडला, हॉल मालकासह लग्न सोहळ्याच्य़ा आयोजकांवर गुन्हा दाखल

Update: 2021-04-30 18:00 GMT

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभाग कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित केला होता. आता या प्रकरणी संबंधित सभागृहावर रुपये ५० हजार दंड आकारणी करण्यात आली आहे. तसेच सभागृह लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संबंधितांवर एफ. आय. आर. दाखल करण्याची प्रक्रिया गावदेवी पोलिस ठाण्यात सुरू आहे, अशी माहिती 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाबुलनाथ मंदिराजवळील दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या 'संस्कृती हॉल' मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या विभाग कार्यालयाला प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच विभाग कार्यालयाच्या चमूने सदर ठिकाणी धाड टाकली असता तिथे विवाह कार्यक्रम सुरू असल्याचे व सुमारे १५० व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच सदर ठिकाणी उपस्थित व्यक्तींमध्ये नियमानुसार आवश्यक असणारे शारीरिक अंतर देखील राखण्यात आले नव्हते.

ही बाब महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन असल्याने सदर हॉलवर आणि विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई केली. या कारवाईमध्ये प्रामुख्याने संबंधित हॉल चालकांवर तात्काळ ५० रुपये हजार दंड ठोठावण्यात आला. तसेच हाॅल चालक व संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Tags:    

Similar News