द्राक्ष खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी देणाऱ्या दै.लोकमतला शेतकऱ्यांची नोटीस
द्राक्ष खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची बातमी आता दैनिकाच्या अंगलट आली असून शेतकऱ्यांनी चुकीची बातमी दिल्याबद्दल लोकमतला कायदेशीर नोटीस धाडली आहे.
दैनिक लोकमतच्या दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सोलापूर ग्रामीण आवृतीच्या अंकात पहिल्या पानावर 'अति द्राक्ष खाल्ल्याने युवकाचा मृत्यू' या मथळ्याखाली वैराग डेटलाईनच्या नावे द्राक्ष फळाविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणारी बातमी प्रसिध्द झाली आहे. या बातमीमुळे सध्या लोकांमध्ये द्राक्षांविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक सदर बातमी देताना संबधित बातमीदाराने वैद्यकीय अहवालाचा आधार न घेता केवळ वैद्यकीय सुत्रांच्या अंदाजावर बातमी आहे. तसेच वैद्यकीय अहवाल प्राप्त होण्यापुर्वीच लोकमत दैनिकाने ठामपणे अति द्राक्षामुळेच मंदार भाऊराव मोरे (वय-२२ रा.वैराग, ता. बार्शी, जि.सोलापूर ) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे जाहीर करुन टाकले आहे.
आधीच एकीकडे कोराना आणि लॉकडॉऊनच्या भितीमुळे राज्यातील द्राक्षउत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना व्यापाऱ्यांकडून कमी भावाने द्राक्षाचे सौदे सुरु असताना लोकमत दैनिकातून अशा प्रकारची चुकीची बातमी प्रसिध्द करुन राज्यातील लाखो द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले आहे. या बातमी विरोधात लोकमत दैनिकास नोटीस पाठवून योग्य खुलासा व राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांची माफी मागण्याची मागणी केली आहे.द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने दुष्काळ,अवकाळी पाऊस, गारपीट या सारख्या नैसर्गिक संकटाशी तोंड देत उत्तम दर्जाची द्राक्षे पिकवत असतो. गेल्या शेकडो वर्षांपासून जगभरातील लोकं द्राक्षफळ पिकवत आणि खात आली आहेत. पण आज वरच्या इतिहासात कधीही द्राक्षे खाऊन माणूस वा इतर कोणता प्राणी दाखवण्याची नोंद नाही. परंतु अख्ख्या विश्वात फक्त लोकमत दैनिकाने द्राक्षे खाऊन माणूस मेल्याचा शोध लावला आहे.
अशा प्रकारच्या चुकीच्या बातमीमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन बाजारपेठांमधील द्राक्षाची मागणी घटणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहेत. त्यामुळे द्राक्ष ग्राहकांच्या मनातील गैरसमज वेळीच दूर होणे गरजेचे आहे. तरी याबाबत लोकमत दैनिकाकडून सदर चुकीच्या बातमी बद्दल तत्काळ माफी मागून योग्य खुलासा होणे गरजेचे आहे. अन्यथा सदल दैनिकाच्या संपादकीय व्यवस्थापना विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे द्राक्षभूमी प्रतिष्ठान संस्थापक अभिजित झांबरे यांनी सांगितले.