संजय राऊत यांनी केलेल्या साडेतीन लोकांच्या टीकेला किरीट सोमय्यांचे प्रत्युत्तर
भाजप आणि शिवसेनेतील वाद टोकाला पोहचला आहे. संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन लोकांना तुरुंगात पाठवणार असे म्हटले होते. त्यावर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले.;
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सामना रंगला आहे. तर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या शिर्ष नेतृत्वासह संजय राऊत यांच्यावरही जंबो कोविड घोटाळाप्रकरणी आरोप केले. त्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक होत भाजपच्या साडेतीन लोकांना अनिल देशमुख यांच्या कोठडीत पाठवणार असल्याचे म्हटले होते. त्यावर किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते की, आजपर्यंत बर्दाश्त केले आता बरबाद करणार. तसेच मंगळवारी शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपला जशाच तसे उत्तर दिले जाईल. त्याबरोबरच भाजपच्या साडेतीन लोकांना अनिल देशमुख यांच्या कोठडीत पाठवणार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे हे साडेतीन लोक कोण असा प्रश्न राज्यातील लोकांना पडला आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे ईडीच्या कार्यालयात भाजपचे कोण लोक बसतात? याचाही खुलासा संजय राऊत करणार आहेत. मात्र किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्यासह शिवसेनेच्या शिर्ष नेतृत्वावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. तर साडेतीन लोकांना तुरूंगात पाठवणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यावरून किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, साडेतीन लोकांना अटक करा किंवा साडेतीनशे पण आधी आरोपांना उत्तरं तरी द्या. तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत म्हणूनच साडेतीन लोकांची नाटकं सुरू आहेत, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.
सोमय्या म्हणाले की, राज्यात मोठा कोविड घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात सगळे फसले आहेत. त्यामुळे या मुळ प्रश्नावर उत्तरे देऊ शकत नाहीत, म्हणून साडेतीन लोकांची नाटकं सुरू आहेत. तसेच साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय मुहूर्त पाहत होते काय? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.