लखीमपूर खिरी घटनेतील जखमी शेतकऱ्यांना तातडीने दहा लाखांची मदत द्या ; संयुक्त किसान मोर्चाकडून मागणी

Update: 2021-11-13 02:40 GMT

नवी दिल्ली :  लखीमपूर खिरी घटनेमध्ये जे शेतकरी जखमी झालेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या घोषणेनुसार तातडीने प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावेत अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकऱ्यांची संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चा करत आहे. लखीमपूर खिरी घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक शेतकरी जखमी झाले होते. मात्र जखमींना अजुनही शासनाकडून मदत मिळाली नसल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच अनेक शेतकरी जखमी देखील झाले होते. भाजपा नेत्याच्या मालिकीच्या वाहानाने या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा यांच्यासह 13 आरोपींना अटक केली. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 45 लाख रुपये तर जे जखमी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा योगी सरकारकडून करण्यात आली होती. मात्र अजूनपर्यंत जखमी शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News