गणेश मंडळांनी सामाजिक भान जपावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
राज्यात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. यानिमीत्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ ट्वीट करत राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.;
राज्यात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. यानिमीत्ताने मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करणार असल्याचे म्हटले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गणेश मंडळांना सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचं संकट दूर झालं आहे. त्यामुळे यंदा उत्साहात, जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करत आहोत. या गणशोत्सवासाठी गणेश मंडळांनी सामाजिक भान जपावे. यामध्ये गणेश मंडळांनी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या महत्वाच्या विषयांवर जनजागृती करावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राज्याच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करण्यात यावा, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर महाराष्ट्राच्या विकासाचा दृढ संकल्प आम्ही केला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या ट्वीट करण्यात आलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले.