आग विझवून अनेकांचे प्राण वाचवणारे प्रकाश हसबे यांचे घरी जाताना अपघाती निधन
पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला (Pune Fashion Street Market) शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या पण साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र याच दरम्यान अनेकांचे जीव वाचवून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन घरी निघालेले कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे यांचे निधन झाले. कर्तव्य तत्पर अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होते आहे.
आग विझवून घरी जात असताना रस्त्यात अपघात होऊन प्रकाश हसबे मृत्युमुखी पडले. मध्यरात्रीच्या सुमारास कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली. त्यानंतर कॅम्प सहीत पुणे शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. ही आग विझवण्यासाठीच्या सगळ्या मोहीमेत पुढे होते ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे आग विझल्यानंतर ते पहाटे घरी जायला निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. यामध्येच प्रकाश हसबे यांचे दुर्देवी अपघाताने निधन झाले.