जळगाव जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचे सहा रुग्ण ; जिल्हा प्रशासन सर्तक
जळगाव जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचे सहा रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सर्तक झाले आहे.याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात जून महिन्यामध्ये डेल्टा प्लसचे सात रूग्ण आढळले होते. हे रूग्ण कुठे बरे होत नाहीत तोच जळगाव शहरात आणखी डेल्टा प्लसचे सहा रूग्ण आढळून आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे.
जून महिन्याच्या अहवालामध्ये डेल्टा प्लसचे सात रुग्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सापडले होते या सातही रुग्णांना कोणत्याही प्रकारचे लक्षण नव्हते ते आता बरे झाले आहेत असं सांगतांना जिल्हाधिकारी राऊत यांनी शहरात आणखी सहा डेल्टा प्लसचे रुग्ण सापडले असल्याचे म्हटलं आहे. सहापैकी दोन रुग्ण हे शहरी भागातले आहेत तर चार हे ग्रामीण भागातील आहेत. साधारणता पाच रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत तर एक रुग्ण हा वयोवृध्द असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.
हे सर्व रूग्ण सध्या सुरक्षित असल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. सोबतच जिल्ह्यातील नागरिकांनी डेल्टा प्लसच्या पार्श्वभुमीवर विशेष काळजी घेण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे.