कुत्रे, मांजरी आणि कोंबड्यांचे तुम्ही प्रतिनिधी नाही, अजित पवार यांनी सुनावले
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आमदारांच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. यावेळी सर्वानुमते आमदारांसाठी आचारसंहिता ठरवण्यात आली आणि त्या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. पण यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य आणि कृती कऱणाऱ्या आमदारांना फटकारले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पायऱ्यांवर आंदोलन करत असलेल्या भाजपच्या आमदारांपैकी नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढला होता, तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांना चिडवले होते. यानंतर त्यांच्या या वर्तनाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्याआधी भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करत अंगविक्षेप केले होते, त्यावरुनही मोठा गदारोळ झाला होता.
या वादानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आचारसंहिता असावी अशी भूमिका घेतली. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बैठक घेण्यात आली. तसेच आमदारांच्या वर्तनाबाबत एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, आचारसंहितेचे पालन करणे हे सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. जनता ही प्रत्येकाच्या वर्तनाकडे लक्ष ठेवून असते. त्यामुळे प्रत्येक आमदाराने जबाबदारीने वागले पाहिजे. नितेश राणे, भास्कर जाधव यांचा उल्लेख न करता कुत्रा, मांजर, कोंबड्या यांचे तुम्ही प्रतिनिधी नाहीत तर जनता तुम्हाला निवडून पाठवते, असेही सुनावले. तसेच आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे विधिमंडळ कामकाजाचे प्रक्षेपण राज्यभरात लाईव्ह दिसते, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे, असे सांगत अजित पवार यांनी सगळ्यांनीच स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांचे समर्थन केले. पण केवळ सूडापोटी आमदारांना एक वर्ष निलंबित करणे योग्य नाही, असे सांगत भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा मांडला.