स्वराज्याच्या आड ब्राह्मण नाही तर शिवरायांचे सासरे, मेहुणे आले, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांचं वादग्रस्त वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये स्वराज्य स्थापनेत ब्राह्मणांनी अडथळा निर्माण केल्याचा आरोप केला जातो. त्यावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी भाष्य केले.;
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना काही लोकांकडून ब्राह्मणांना टार्गेट केलं जातं. त्यामध्ये श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहीला. त्याचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शरद पवार यांनी कृष्णाजी भास्करचा उल्लेख केला. त्यावेळी ते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याच्यापाशी येऊन थांबले. अफजलखानाचा वकील कोण होता? असा प्रश्न विचारला. भास्कर कुलकर्णीच ना, असं म्हणाले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या वाजवणाऱ्या लोकांचाही मी निषेध करतो, असं वक्तव्य आनंद दवे यांनी केले.
तसेच आनंद दवे पुढे म्हणाले, स्वराज्याच्या आड येणाऱ्या हजार कृष्णा भास्कर कुलकर्णीला कापा. जोशी, कुलकर्णी, देशपांडे किंवा ब्राह्मण संघटना काही बोलणार नाहीत. पण स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेल्या दादोजी कोंडदेव यांच्यापासून ते बाजीप्रभू देशपांडे यांच्यापर्यंतचा उल्लेख का होत नाही?, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी उपस्थित केला.
एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला आडवे येणारे त्यांचे नातेवाईक, त्यांचे सासरे, त्यांचे मेहुणे यांचा उल्लेख का केला जात नाहीत, असाही सवाल यावेळी आनंद दवे यांनी उपस्थित केला.
यावेळी आनंद दवे म्हणाले, ब्राह्मण समाजाला टार्गेट केल्याशिवाय राज्यातील अनेकांचे राजकारण होत नाही. त्याबरोबरच ज्या पक्षाला वाढवण्यासाठी ज्या संघाने प्रयत्न केले आणि ज्या संघाला वाढवण्यासाठी ज्या समाजाने सर्वाधिक प्रयत्न केले. त्याच समाजाला शत्रू का मानलं जातं, असा सवालही आनंद दवे यांनी भाजपचं नाव न घेता विचारला.
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढवण्यासाठी पेशवे लढले. पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले. पण तरीही पेशव्यांना बदनाम केलं जात असल्याची खंत आनंद दवे यांनी व्यक्त केली.
छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं ते ब्राह्मणांना टार्गेट करण्यासाठीचे आहे. त्याबरोबरच आगामी काळात मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र 30-32 टक्के समाज एकमेकांच्या विरोधात येईल म्हणून ब्राह्मण समाजाला सॉफ्ट टार्गेट केलं जातं. त्याबरोबरच जेव्हा हिंदू संकटात येईल, त्यावेळी पहिला वार हा ब्राह्मण समाजावर होईल, असं वक्तव्य आनंद दवे यांनी केलं.
भाजपने ब्राह्मण समाजाला गृहित धरू नये. आमची संख्या 15 टक्के इतकी आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील 40 मतदारसंघाचं गणित बिघडवू शकतो. आता कसबा गेलाय. त्यामुळे उरला सुरला खडकवासला सुद्धा हातून जाईल, असा इशाराही आनंद दवे यांनी दिला.
ब्राह्मण समाज आपल्यातलं क्षत्रियत्व विसरला आहे. त्यामुळे कोकाटे, नेमाडे आणि भुजबळ यांची वक्तव्य भाजपला माहिती नव्हते का? त्यामुळे आपल्या विचारांचा एकही नेता त्यांना माहिती नव्हता का? असाही सवाल दवे यांनी उपस्थित केला. यावेळी आनंद दवे हे पुण्यातील वारजे येथे ब्राह्मण समाजाची बैठक झाली. यावेळी आनंद दवे बोलत होते.