राणीबागेत 106 कोटींचा भ्रष्टाचार, भाजपचा गंभीर आरोप
मुंबई महापालिकेच्या पार्श्वभुमीवर भाजप विरूध्द सत्ताधारी शिवसेना संघर्ष रंगला आहे. भाजपकडून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच राणीबागेत 106 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपाने केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत आहे. त्यापार्श्वभुमीवर सत्ताधारी शिवसेना विरूध्द भाजप वाद चांगलाच रंगला आहे. भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात आहेत. आमदार आशिष शेलार, किरीट सोमय्या, अमित साटम यांच्या आरोपांनी सत्ताधाऱ्यांना घायाळ केले असतानाच आता आमदार मिहीर कोटेंनी 106 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
भायखळा येथील राणीबागेत विदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत 106 कोटींचा गैरप्रकार झाल्याचा आरोप मिहीर कोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबरोबरच ही निविदा थांबवण्याची मागणी केली आहे. मात्र निविदा न थांबवल्यास भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मुंबईच्या रस्ते कामातील घोटाळा, परिवगन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळा भाजपने उघडकीस आणला. त्याबरोबरच महापालिकेने राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. १०० कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे १८५ कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले.
त्यावरून महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून भीती व्यक्त केली होती. तर हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी 106 कोटींची निविदा सादर केली आहे. त्यात 188 कोटींच्या बोलीसाठी 294 कोटींच्या निविदा सादर केल्या आहेत. यासंदर्भात लाच लुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. तर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर मुख्यमंत्री कार्यालयात महापालिकेचे निवृत्त उपायुक्त भ्रष्टाचाराचे महामार्ग तयार करत आहेत, असा आरोप आमदार मिहीर कोटे, विनोद मिश्रा आणि नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी केला. तर पेंग्विन टोळीने राणीबागेवर 106 कोटींचा दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप आणदार मिहीर कोटेंनी केला.