एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासून आघाडी सरकारच जबाबदार - शेलार
मुंबई// राज्यात मागील सहा महिन्यात तब्बल 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्यात. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासून आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. शेलार यांनी आंदोलक एसटी कामगाारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
एसटी कर्मचाऱ्यांशी गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा असं शेलार म्हणाले. 40 जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे ठाकरे सरकार रक्तपिपासू असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी केली. एसटीचे राज्य शासनात विलनीकरण, सहावा वेतन आयोगासह इतर मागण्या घेऊन एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या मागण्या मान्य करा आणि एसटी कामगार जगवा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
सोबतच शासकीय कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती एसटी कर्मचाऱ्यांना द्या. एवढीच कामगारांची मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे.असं शेलार म्हणाले. ही लढाई केवळ एसटी कामगारांची नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरिब, दलित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे, असं त्यांनी सांगितलं.