सांगलीतही ऑनर किलींगचा प्रयत्न, प्रेमविवाह करणं ठरलं गुन्हा

सैराटच्या चित्रपटातील शेवटच्या दृष्याने सर्व प्रेक्षक हळहळले होते. तर गेल्याच काही दिवसांपुर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाली होती. त्यापाठोपाठ सांगलीत आणखी एक सैराट घडला आहे. ( Another sairat in progressive Maharashtra);

Update: 2022-02-05 01:38 GMT

प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात सख्या आई आणि भावानेच कोयत्याने वार करत बहिणीचे शीर धडापासून वेगळे केल्याची घटना घडली होती. तर औरंगाबाद जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच सांगली जिल्ह्यात ऑनर किलींगचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र राज्याला संतांचा, विचारवंतांचा आणि महापुरूषांचा वारसा लाभला आहे.त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटले जाते. मात्र याच महाराष्ट्रात प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून ऑनर किलींगचे दुर्दैवी प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरजमधील सुभाषनगर येथे प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून तरुणावर सैराट चित्रपटातील दृष्यासारखा धारदार शस्रांनी हल्ला केला. यामध्ये तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर मिरजेतील सुभाषनगर येथे राहणाऱ्या योगेश लवाटे या 28 वर्षीय तरुणाने दीड महिन्यापुर्वी भडकंबे आष्टा येथील तरुणीशी प्रेम विवाह केला होता. तर या विवाहाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे योगेश लवाटे आणि मुलीने पळून जात लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर दोन दिवसांपुर्वी मुलगी आणि मुलगा दोघांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. तर हे प्रकरण मिरज पोलिस ठाण्यापर्यंत गेले. यावेळी मुलीच्या वडिलांनी योगेश लवाटे याला धमकी दिली होती. मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी गुरूवारी रात्री साडेआठ वाजता योगेश लवाटे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्राने वार केले. तर योगेशला त्याच्या मित्रांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

यानंतर योगेश लवाटे याच्या काकू वैशाली लवाटे यांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तर शहर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र योगेशला दोन दिवसांपुर्वी मुलीच्या वडिलांनी दिलेली धमकीच या हल्ल्याला कारणीभूत असल्याची अटकळ बांधण्यात येत आहे. तर हा सैराट चित्रपटासारखाच हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.

वैजापूर तालुक्यात जन्म देणाऱ्या आई आणि सख्या भावानेच बहिणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच सांगलीतील मिरजेत पुन्हा ऑनर किलींगचा प्रकार घडल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.


Tags:    

Similar News