सध्या कोरोनाच्या काळात समाजात विज्ञानाच्या नावाने अनेक अशास्त्रीय प्रकार सुरू आहेत, त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर सोसावे लागत आहेत.
या प्रकारच्या फसव्या विज्ञाना (स्यूडो सायन्स) विरोधातील लढाईच्या विरोधात अंनिसने मोहिम राबवली असून या विषयासंदर्भात कार्यकर्ते व जनतेचं प्रबोधन केलं जाणार आहे. म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने 'फसव्या विज्ञान विरोधात जनजागरण मोहीम' राबवली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ११ मे ते १४ मे रोजी चार दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आलेली आहे. ही सर्व व्याख्याने दररोज सायं. ५ वाजता झूम आणि फेसबुक पेज वर होतील.
यामध्ये पहिल्या दिवशी, मंगळवार ११ मे रोजी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या 'छद्मविज्ञान विरोधी विशेषांकाचे प्रकाशन' आयसर पुणे येथील जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजीत रथ यांचे हस्ते होईल. डॉ. रथ हे 'फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर व्याख्यान देणार आहेत,
दुसऱ्या दिवशी, बुधवार, १२ मे रोजी छद्मविज्ञानाचे अभ्यासक प्रा. प.रा.आर्डे (सांगली) हे 'फसव्या विज्ञानाचा ऑक्टोपस' या विषयावर बोलतील.
तिसऱ्या दिवशी, गुरूवार, १३ मे रोजी वाई येथील सुप्रसिद्ध स्रीरोग तज्ज्ञ व विज्ञान लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर हे 'छद्म वैद्यक : फसव्या उपचारांचे मायाजाल ' या विषयावर बोलतील.
चौथ्या दिवशी शुक्रवार, १४ मे रोजी मनोविकार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांच्या भाषणाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. या प्रसंगी ते 'लोक फसव्या विज्ञानाला का भुलतात?' या विषयावर मार्गदर्शन करतील.
या सर्व व्याखानांचे लाईव्ह प्रसारण मॅक्स महाराष्ट्र तसेच नरेंद्र दाभोलकर थॉट्स, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या फेसबुक पेजेस वर होईल.