भाजपला सत्तेपासून दूर ठेऊन शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगवेगळ्या विचारधारेचे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. सुरुवातीला ही आघाडी 25 वर्षा पर्यंत टिकेल असं खुद्द मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांसमोर सांगितलं. मात्र, वर्ष दीड वर्ष उलटत नाही. तोच महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या अंतर्गत कुरबुरी वाढल्या आणि स्वबळाचा नारा द्यायला सुरुवात झाली आहे.
काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेने ही एकला चलो रे म्हणत शिवसंपर्क अभियान सुरू करून स्वबळावरच निवडणूका लढवण्याचे संकेत दिल्याचं चित्र आहे.
शिवसंपर्क अभियानाला जळगाव जिल्ह्यातुन सुरवात करण्यात आली आहे. तेही भाजपचा 30 वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या मित्र पक्षात असलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर मतदार संघातून शिवसेनेने स्वबळाचा बिगुल फुंकलाय.
'पालकमंत्री आपल्या दारी'
ह्या संकल्पाद्वारे शिवसेनेने मुक्ताईनगर मतदार संघातील आमदार चंद्रकांत पाटील यांना बळ देण्यासाठी मतदार संघातील प्रश्न आणि विविध विभागातील शासकीय अधिकारी यांना एकत्र तक्रारींचा निपटारा करण्यात प्रयत्न केला जातोय. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात कार्यक्रम घेतले.
यावेळी नागरिकांची मोठी गर्दीही होती. विशेष म्हणजे राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार असतांना मुक्ताईनगर येथील कार्यक्रमावरील प्रमुख बॅनर वर फक्त शिवसेनेच्याच नेत्यांचा फोटो होता. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या मंत्र्यांचा कोणाचाही फोटो नव्हता.
शिवसेनेने थेट राष्ट्रवादीला म्हणजेच एकनाथ खडसे यांनाच आवाहन दिलं असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. ज्या मुक्ताईनगर मतदार संघात भाजप सेना युती असताना एकनाथ खडसे यांनी शिवसेना कधीच वाढू दिली नाही. आज त्याच मतदार संघात शिवसेनेचा आमदार आहे.
एकनाथ खडसे यांचा उल्लेख न करता गुलाबराव पाटील यांनी खडसें वर निशाणा साधला की, 30 वर्ष मुक्ताईनगर मध्ये मूलभूत सुविधा देऊ शकले नाही. मुक्ताईनगर ना खेड आहे ना शहर, रस्ते नाहीत, पाणी नाही अशी अवस्था करून ठेवली आहे.
एकीकडे मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि काहीच नाही खान्देशच प्रवेशद्वार म्हणून मुक्ताईनगर कडे पाहिलं जातं. मात्र, आपण दोन वर्षात ह्या कायापालट करू अस गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत, त्यात मुंबईसह नाशिक पुणे या महत्त्वाच्या महापालिका तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणूका आहेत.
ह्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याच्या बेतात किंवा जास्तीच्या जागा पदरात पाडून मित्र पक्षांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यामुळेच सर्वच जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालावर कोणाचा स्वबळाचा नारा कायम टिकून राहतो, हे पुढे जेव्हा केव्हा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील त्या वेळसच राजकीय व्युव्हरचना ठरवली जाईल.