आदई अर्थ डे

पृथ्वी आपण तिला आई म्हणतो... मात्र, आपल्या आईला आपण काय देतो? तिने सुंदर दिसावं म्हणून कधी आपण प्रयत्न केले आहेत का? आपण सकाळी जिथं फिरायला जातो. तो परिसर सुंदर हिरवागार असावा, असा विचार कधी आपण केला आहे का? हा विचार करता करता वाचा आदई ग्रृपची तुम्हाला पेरणा देणारी यशोगाथा प्राजक्ता शाह यांच्या लेखणीतून;

Update: 2021-04-21 17:58 GMT

1969 मध्ये युनेस्कोने अर्थ डे ची म्हणजेच पर्यावरणाच्या संवर्धनाची संकल्पना प्रथम मांडली. पण मनुष्य मात्र शहरे वसवण्यासाठी व स्वत:च्या अमर्याद गरजा पुरवण्याकरीता बेसूमार वृक्षतोड करतच राहीला. कोविड सारख्या जागतिक माहामारीत ऑक्सिजनसाठी माणूस कसा सैरावैरा धावत सुटतो. त्याची निसर्गाने मानवाला एक झलक दाखवून दिली. पण मंडळी, अजुनही चुका सूधारायला वाव आहे बरे...

पनवेल येथील आदई हिरवाई ग्रुप ने धरणी हिरवी करायचा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे केला.

2018 मध्ये, पनवेल येथील आदई डोंगरावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अर्चना पडवळ, सुवर्णा जाधव, रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर बोराटे, ललिता गोविंद, वसुधा कराळे व इतर महिलांनी ओसाड डोंगरावर वृक्षारोपण करण्यासाठी आदई हिरवाई ग्रुप स्थापन केला. माजी सरपंच संदीप शेळके, घरच्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे झाडे लावत असत. प्रशांत आणि प्रिया खोब्रेकर यांनी फ़ॉरेस्ट ऑफिसर सोनावणे यांना भेटून सर्व्हे करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोणतेही पर्मनंट स्ट्रक्चर न उभारता कामाला दणक्यात सुरवात केली. पाणी फाऊंडेशनमधे कार्यरत असलेल्या मधुकर पवारांनी यात लाखमोलाचं मार्गदर्शन केले. सिंधू चव्हाणांनी आर.सी.एफ. कडून 200 रोपं मिळवली.

रेल्वे स्टेशन मास्टरांचा ग्रुप स्व:खर्चाने झाडे लावायला पहिल्या हाकेला धावला. प्रफुल गायकवाड, जगदीश जाधव यांची पत्नी पूजा यांनी बांबू देऊन श्रमदानात हातभार लावला. विजय मंडलीक यांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होण्याबरोबरंच रोटरीक्लबकडून झाडांच्या संरक्षण जाळ्यांसाठी, गवत कापणी मशीनसाठी आर्थिक मदत मिळवून दिली.

हा उपक्रम लोकांच्या इतका जिव्हाळ्या झाला की चक्क कुर्ल्याहून पोलिस निरिक्षक विजय हतिस्कर व मनोजकुमार म्हात्रे तर नेरुळ वरुन मधुकर पवार, BARC चे अमित आमकर, त्यांची 6 वर्षाची छोटी कन्या स्वरा येथे न चुकता यायला लागले.

आदई डोंगरावर चालू असलेले काम पाहून बालाजी सोसायटीतील रहिवासी, मॉर्निंग वॉकला येणारे, ट्रेकींग तसेच पावसाळी पिकनिकला येणारे इतरही ग्रुप, पनवेल ट्रेकर्स, पतंजली योग ग्रुप, सायकलीस्ट ग्रुप, या पर्यावरण संवर्धन कार्यक्रमात मनोभावे सामील झाल्याने आदई हिरवाईचे कुटूंब तर विस्तारले पण हिरवाईही पसरली.

येथे केवळ झाडे लावण्यापेक्षा झाडे जगवण्याला जास्त महत्व दिले जाते.

सध्या या ठिकाणी सुमारे 450 झाडे जगवण्यात आली आहेत. टाकाऊ तेलाच्या डब्यांपासून झाडांना पाणी देण्याच्या झाऱ्या बनवल्या गेल्या. येथील पालापाचोळ्याच्या कचऱ्याचं ब्लॅकगोल्ड म्हणजेच सेंद्रीय खतात रुपांतर करुन पर्यावरणाचे संवर्धन उत्तम प्रकारे केले.

एका वृक्षाच्या आजुबाजूला लाखों छोटे मोठे जीव आपापले जीवनकार्य पूर्ण करत असतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याचा सखोल अभ्यास करुन, मुद्दाम स्थानिक झाडेच वृक्षारोपणासाठी निवडली गेली. वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, आंबा, आवळा, करंज, सागवान, चिंच, शेवगा, फणस इत्यादी स्थानिक प्रजातीची झाडे येथे बहरली आहेत.

विशेष म्हणजे एप्रिल-मे च्या कडक उन्हात जरी पाणी नाही मिळाले, तरीही ती जगतील अशी कणखर बनली आहेत. झाडांना कुंपण करणे , झाडांच्या सभोवतीचे तण काढणे, पाणी घालणे, वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी नियंत्रीत जाळ रेषा (Fire Line ) बनवणे, मातीची धूप होऊ नये म्हणून दगडी अनघड बांध (Loose Boulder Structure) बांधणे याप्रकारची कामे या ग्रुपच्या माध्यमातून निरंतरपणे चालू आहेत .

आदिवासींनी शेती करताना रासायनिक खते वापरु नयेत म्हणून त्यांना समजावण्याचे प्रयत्न आदई हिरवाई ग्रुप कडून केले जातात. मातीचा पोत कसा टिकवावा या बद्दलचे आदीवासींचे मत परिवर्तन होताना दिसत आहे. एप्रिल-मे मध्ये पाड्यांत पाणी टिकावे व आदिवासींना घरादारासकट स्थलांतर करावे लागू नये. म्हणून बंधारे बांधून दिले जातात. आपले निवास स्थानावरील म्हणजे पृथ्वीवरील अगाध प्रेमापोटी आदई तलाव सफाई काम हाती घेतले जाते.

या नेत्रदीपक उपक्रमात जवळ जवळ 100 पेक्षा जास्त लोक कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता रोजच अर्थ डे साजरा करत असतात.

अर्थ डे च्या निमित्ताने तुमच्या आमच्यासरखा सामान्य माणूस जरी डोंगर हिरवा करायचा विडा नाही उचलू शकला तरी आपापली प्रत्येक खिडकीत व गॅलरीत झाडे लाऊन ती हिरवीगार करुन या पृथ्वीला ऑक्सिजन देऊन मानवजात नक्की वाचवू शकतात.

प्राजक्ता शाह

Tags:    

Similar News