फडणवीसांनी माझं जीवन उध्वस्थ करण्याचा प्रयत्न केला: खडसेंनी डागली तोफ

तब्बल चाळीस वर्ष महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी उभारण्यासाठी झटलेल्या आणि खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला आज रामराम ठोकला. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले.;

Update: 2020-10-21 10:30 GMT

"मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली" असं एकनाथ खडसे म्हणाले.गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले.

राजीनामा दिल्यानंतर खडसे भावनिक होत म्हणाले की, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असं ते म्हणाले.

खडसे म्हणाले की, माझा निर्णय मी घेतला आहे. जनता माझ्यासोबत आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेने एकदाही राजीनाम्याची मागणी केली नाही. मी स्वयंस्फूर्तीने राजीनामा देतोय. मी देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल केला. हे सर्वात त्रासदायक होतं, असं ते म्हणाले. मी आजवर जे मिळवलं ते माझ्या ताकतीने मिळवलं. भाजपमध्ये कुणाच्या उपकारानं पदं मिळवली नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर एकही आरोप झालेला नव्हता. मात्र त्यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मला तोंडावर एक बोलायचं आणि मागून माझ्याविषयी वेगळं षडयंत्र केलं गेलं, असंही खडसे म्हणाले. आज यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला उद्या हे बलात्काराचा गुन्हा दाखल करतील, असं ते म्हणाले.मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत असं खडसे म्हणाले.

मला भाजपमध्ये थांबवण्यासाठी किंवा चर्चेसाठी चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही फोन केला नाही, असंही ते म्हणाले. मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटणारा देखील नाही, असंही खडसे म्हणाले. रक्षाताईं खडसे भाजप सोडणार नाहीत, त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, असंही ते म्हणाले. रोहिणी खडसे देखील जिल्हा बॅंकेवर राहतील, असंही ते म्हणाले. मी कुठल्याही आश्वासनावर राष्ट्रवादीत जात नाहीये, असंही ते म्हणाले. मी पदासाठी जात नाहीये, पद मी इथंही मिळवलं असतं, असंही ते म्हणाले.भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास

  • जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर १९५२ रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला.
  • एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. ग्राम पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
  • त्यानंतर १९८७ साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले.
  • १९८९ साली भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.
  • १९८० साली भाजपामधून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार केली.
  • महाराष्ट्रात १९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ-सिंचन ही खाती संभाळली.
  • नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोंबर २०१४ या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. प्रभावी वकृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे.
  • पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी तीन जून २०१६ रोजी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. खडसेंऐवजी भाजपाने त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना तिकिट दिले. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव केला.
  • २०१९ पर्यंत सलग सहावेळा एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली.
Tags:    

Similar News