पंढरपुराजवळ उभे राहणार विठ्ठलाचे शब्दशिल्प

पंढरपूरच्या विठ्ठलाची महती अनेक संतांनी आपापल्या साहित्यामधून मांडली आहे. पण भाषिक संगम आणि सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतिकात्मक विठ्ठल शब्दशिल्प पंढरपूरजवळ उभे राहणार आहे. वारी, तमाशा परंपरेचे अभ्यासक संदेश भंडारे यांच्या संकल्पनेतून हा शब्दशिल्प उभे राहणार आहे. यामागचा हेतू संदेश भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडला आहे.;

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-06-12 02:11 GMT
पंढरपुराजवळ उभे राहणार विठ्ठलाचे शब्दशिल्प
  • whatsapp icon

बहुत सुकृतांची जोडी

आत्मभान जागवणारे

विठ्ठलाचे शब्दशिल्प !

आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने

----- संत श्रेष्ठ तुकोबा !

महाराष्ट्राचे लोकदैवत विठोबा, भक्ती संप्रदयाचे आद्य प्रतिक आहे. विविध भाषा,संस्कृतींचे एकजिनसी अस्तित्व म्हणजे पंढरपूरची वारी. या अस्तित्वाचे विविध पदर वारकरी संतांनी आपल्या अभंग,ओवी आणि काव्यातून अजरामर केले आहेत.

भाषा हे पृथ्वीवरील माणसांशी संवाद-संपर्क साधण्यासाठी माणसानेच शोधलेले एक विलक्षण साधन. भाषेने माणसं जोडली गेली,संवाद घडला,परस्पर प्रेम आणि जिव्हाळा वाढला. देश-प्रदेश कोणताही असो माणसांनी भाषा शोधली. संवाद साधला.प्रेम वाटले. माणसांचा समाज उभा राहिला.

भक्ती मार्गाचा संदेश देणार्यां संतांनी आपल्या काव्य-अभंग-ओवी अशा साहित्यातून याच भाषेचा अपूर्व साक्षात्कार आपल्याला घडवला. विठ्ठल म्हणजे प्रेमाची भाषा रुजवणारा संतांचा सखा झाला! वारी म्हणजे अभंग-भाषा-प्रेम-जिव्हाळा सांडणारा प्रवाह झाला. आपण सर्व गेली आठशे वर्ष हा संतभाव जीवापाड जपला आहे!

या संत साहित्यातून आणि काव्यातून मराठी भाषा समृद्ध झाली.म्हणूनच नामदेव, तुकोबा,जनाबाई आणि संत शेख महंमद अशा अनेक संतांच्या साहित्यातून मराठी, कोकणी, कानडी, तेलगू, हिंदी, भोजपुरी आणि उर्दू,पर्शियन,अरबी अशा विविध भाषांतील शब्दांचा आणि त्या भाषांचा सहज वापर झालेला दिसतो. संतांनी आम्हाला भषिक सहिष्णुतेची महती शिकवली! अशा भाषिक संयोग संगमातून मराठी भाषा गेल्या साताआठशे वर्षात समृद्ध झाली.

याचे मूर्त रुप म्हणून विठठलाचे त्रिमितीमधील एक शब्दशील्प उभे करण्याची संकल्पना समोर मांडत आहोत. या शिल्पात मराठी, कानडी, हिंदी, उर्दू, फारसी,अरबी,तेलगू, अशा अनेकानेक भाषांतील मराठीमध्ये स्थान मिळवलेले शब्द विठठल रुपात साकारले आहेत. भाषिक संयोग प्रक्रियेचा मुख्य वाहक म्हणजे पंढरपुरची वारी ! ही शेकडो वर्षांची सजीव प्रक्रिया ठरली आहे! मह्णूनच तुकोबा म्हणतात --

आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने !

हे भान आणि शहाणीव आज विस्मृतीत जात आहे. ते काही प्रमाणात जागवण्याचे काम हे विठोबाच्या भाषिक शब्दशिल्पातून करण्याचा हा प्रयत्न.

आत्मभान नव्याने उजळणारा हा आमचा शब्दरुप विठठल!

विठ्ठलाच्या रेखाकृतीत साकारलेल्या या शिल्पात मराठीत रुजलेल्या अन्य भाषेतील समानार्थी शब्दांची रेखाटने आहेत. उदाहरणार्थ, तमाशा किंवा कुस्ती हे शब्द अरबी भाषेतही त्याच अर्थाने वापरले जातात.किंवा पगार आणि तब्येत हे दोन्ही शब्द फारसी भाषेतही त्याच अर्थाने वापरले जातात. जगभरातील अनेक भाषेतील मराठी शब्द किंवा इतर भाषेतून मराठीने स्वीकारलेले शब्द या विठठलाच्या आकृतीत सामावले आहेत. या सर्व शब्दांनी त्या,त्या भाषेत वेगवेगळी लिपी स्वीकारली. त्यांचा लिखित आकार बदलला .परंतु अर्थ मात्र तो राहिला. भाषा आणि शब्द कोणतेही असो अर्थाचा विठठल तोच राहिला.

अशी ही 'बहुत सुकृतांची जोडी.म्हणूनी विठठल आवडी !

भाषिक संगम आणि सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतिकात्मक शिल्प उभारण्याची ही विलक्षण संकल्पना प्रसिद्ध फोटोग्राफर आणि वारी, तमाशा परंपरेचे सजग अभ्यासक संदेश भंडारे यांची आहे.

या वर्षी देहू आळंदीतून वारीची सुरवात होत असतानाच या शिल्पाची उभारणी वारीच्या शेवटच्या मुक्कामाच्या वाटेवर पंढरपूरच्या अगदी जवळ पिराची कुरोळी जवळील चिंचणी येथे होत आहे. वीस फूट उंचीचे हे शब्दशिल्प वारीच्या वाटेवर उभे केले जात आहे. संत परंपरेचा सामाजिक आशय प्रतिकात्मक स्वरुपात उभारणे हे एक ऐतिहासिक काम ठरेल यात शंका नाही. या लोखंडी शब्दशिल्पाचा अंदाजे खर्च सव्वा दोन लाख रुपये इतका आहे.

या शब्दशिल्पाच्या उभारणीसाठी आपल्या सगळ्यांच्या आर्थिक सहभागाची अपेक्षा आहे.

त्यासाठी आपल्याला कळकळीचे आवाहन आम्ही करत आहोत.

संदेश भंडारे

(९४२२३०९९२३)

नीलिमा कढे , केशव कासार, सचिन निंबाळकर

निशा साळगावकर, प्रमोद मुजुमदार

Similar News