बंजारा समाजाची पारंपारिक होळी
होळी सर्वच साजरी करतात. परंतु, बंजारा गणात होळी साजरी करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला नवचैतन्य देणारी आहे.;
रवी चव्हाण, मुक्त पत्रकार
भारतात सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये होळीचे माहात्म्य तर खूप वेगळे आहे. होळी सर्वच साजरी करतात. परंतु, बंजारा गणात होळी साजरी करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला नवचैतन्य देणारी आहे. सिंधू संस्कृतीचा वारसा लाभलेलं बंजारा गण होळी सणात लोकप्रबोधन करत आपली पूर्ण हौस भागून घेतो. मनुष्याला होळी उर्जा, उत्साह आणि तारुण्य देते असे बंजारा लोकांची धारणा आहे. मोहाच्या फुलांनी पारंपारिक दारु तयार करुन मदमस्त पद्धतीने द्वेष, मत्सर, लोभ, स्वार्थ, पक्षपात विसरुन गोरमाटी एकसंघ होवून होळी खेळत असतो. फाल्गुन महिना लागल्यापासून हळूहळू तांड्यात डफाचा पारंपारिक समधूर आवाज एकू येऊ लागतो. लेंगी नृत्याची लगबग सुरु होते. शेताची कामे पूर्ण झालेली असतात. अशात मनमोकळ्याने बंजारा गण होळीची तयारी करु लागतो. केसुला अर्थात पळशाच्या फुलाचे नैसगिक रंग होळी खेळण्यासाठी बनवू लागतो यातून या गणाची निसर्गावरील प्रेम अधोरेखित होतं. लेंगी हा बंजारा समाजातील होळी उत्सवाचे गीत आहे. गोरबोलीमधील या गीतामधून गोरमाटीचे लोकजीवन, लोकउत्सव, लोकगाथा आणि लोकसाहित्याचे रंग दिसून येते.
होळी आयीरे रतनसिंग डफमंडल ।। धृ ।।
कायी केरो लकडा न कायी केरो चमडा ।। १ ।।
चांदणेरो लकडा न मरगलारो चमडा ।। २ ।।
रतनसिंग होळी आली आहे. तू डफ तयार करुन घे. डफ बनवण्यासाठी चंदनाचे लाकूड आणि हरणाचे कातडे घेवून डफ बनवून घे. एखाद्या उत्सवासाठी चंदनाचे आणि मृगचर्माने डफ तयार करुन घेण्याची कल्पना किती किती रम्य आणि आनंददायक आहे. लोकसाहित्यात ही कल्पना केवळ बंजारा गणच करु शकतो. बंजारा समाजाचे लोकसाहित्य अत्यंत समृद्ध आहे. यामध्ये स्त्रियांना अग्रस्थान देण्यात आले आहे. मौकीक पद्धतीचे ही साहित्यपरंपरा महिलांनीच पुढे नेली आहे. बंजारा लेंगी मध्ये अदभूत ताकद आहे. लेंगी सुरु झाली की आजूबाजूच्या वातारणात उत्साह निर्माण होऊ लागतो. हळूहळू डफ वाजू लागल्यावर नाचण्याचा मोह आवरल्या जात नाही. एखाद्या प्रेयसीला प्रियकराला भेटता येत नसल्याने ती व्याकुळ असते आणि लेंगीचा मोहसुद्धा आवरता येत नाही.
डफ धीरोल धीरोल धीरोल रसीयो,
डफ धीरो ल र ।। धृ ।।
डफ डारो घोर सणीर पोळी पोवतू
सोड दिनी लोया नाचण लग गीरे ।। १ ।।
डफ डारो घोर सणीर पाणी भरतू
फेक दिनी वटला नाचण लग गीरे ।। २ ।।
वरील गीतामध्ये प्रेयसीचे भावविश्व दिसते ती म्हणते माझ्या प्रियकरा तू डफ हळू हळू वाजव. तुझ्या डफाचे आवाज ऐकले आणि पोळी करता करता, उंडा फेकून नाचू लागले. तुझ्या डफाचा आवाज मी पाणी भरताना ऐकला, कळशी तशीच टाकून मी नाचायला लागले. अशा लेंगीच्या गीतामुळे बंजारा होळीचे माधूर्य फुलत जाते किंबहुना मन उत्साहित होऊन रंगू लागते. होळीच्या दिवशी दंडाच्या रूपाने नायकाकडून एक रुपया घेण्याची प्रथा तांड्यामध्ये आहे. नायक म्हणजे तांड्यातील म्होरक्या होय. पहिल्या दिवशी संध्याकाळी तांड्यातील गेरिया अर्थात गावातील तरुण आणि डायसाण अर्थात गावातील न्यायनिवाडा करणारे ज्येष्ठ वडीलधारी लोकांना सोबत घेवून होळी खेळण्यासाठी नायकाकडे परवानगी घेण्याची पद्धत आहे.
अन भाईरे, हारे थाके गेरीया उतरे।। धृ।।
अन भाईरे, आयेन उभे रक नायकेरो दरबार ।। १।।
अन भाईरे नायकन दिनी एक रपीया पायजो।। २।।
पाचणं माणो एक पचीस तम जाणजो।।३।।
ओरी गोरीन दिनी छाळहाल बोकडो पडी तुकारी...बो.....बो...बो।।४।।
तांड्यातील तरुण व वृद्ध मंडळी नायकाच्या दरबारात हजर होतात नायकांनी दिलेल्या एक रुपयाला आपण पन्नास रुपये समजून स्वीकार करायच नायकणने त्यासोबत एक तरुण बोकड भेट दिला आहे असे उल्लेख करत नायक आणि नायकणचा जय जयकार करतात. नायकाच्या घरासमोर लेंगी गात होळीची जागा निश्चित केली जाते.
चालोरे डायसाणें होळीर खेला।।१।।
चालोरे डायसाणें होळीर कुथा।। २।।
चला मित्रांनो आपण होळी खेळूया आणि होळीची जागा निश्चित करू आणि नायकाकडून दंड आलेला एक रुपया एक खड्डा खोदून त्यात पुरले जाते व त्यानंतर तेथे एक लेंगी गीत गायले जाते.
पेना रेतेते डुंगर खोळा अब आये तांडो तांडेम बे।। १।।
नागा पुरेरो नागा स्वामी स्वामीछं. आब धुत बे ।। २।।
बंजारा समाज आधी जंगल – डोंगराच्या माथ्यावर राहत असे. त्यामुळे या लेंगीमधून त्यांच्या वास्तव्याचा भावविश्व पुढे उभा करण्यात येत. नागपूरच्या डोंगरातील नागास्वामी संत आपल्या तांड्यात होळी खेळण्यासाठी आला आहे. त्यामुळे आता होळी खेळण्यात खूप मजा येईल म्हणत नाचत गात लेंगी सुरु केली जाते. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात तांड्याचा नायक मध्येच त्यांना इशारा करतो, वर्षभरात ज्या कुटुंबात दुखद घटना घडली असेल अशा घरासमोर गेरिया अर्थात तरुण जावून घरातील दुखी माणसाला धीर देतात आणि त्यांना सोबत घेवून सांत्वनपर लेंगी खेळू लागतात.
धरती तोपर अबंर नही रे कोई धरती तोर ।। १।।
अबंर हेगे एक चांदान सुर्या...ओरे नव ।। २ ।।
लेंगी या आशयपूर्ण गीत प्रकाराच्या माध्यमातून सिंधू संस्कृतीशी नाळ जुळलेल्या बंजारा गणाची पारंपारिक होळी साजरी केली जाते. अत्यंत समृद्ध असलेला बंजारा समाजाचे लोकसाहित्य इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी नटलेले आहे.