.. .तर सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य ठरणार

Update: 2025-03-25 17:43 GMT

८ वर्षांपूर्वी, जेव्हा डॉक्टरांवर काही हल्ला झाला होता, तेव्हा मी हे लिहिलं होतं. आज रिया चक्रवर्तीची निर्दोषता आणि कुणाल कामराचा ‘जनहित याचिका’ प्रकार पाहता, दुर्दैवाने त्यावेळेला उमगलेला सामाजिक शरीरशास्त्राचा धडा अजूनही तितकाच लागू पडतो…

कोणत्याशा प्रकारावरून चिडलेल्या जमावाने यावेळेला डॉक्टरांवर हल्ला केला होता. डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसेचा जोरदार निषेध त्यावेळेला आणि आजही करायला हवा – ठामपणे, स्पष्टपणे, आणि कोणत्याही किंतु-परंतुशिवाय. असे हल्ले झाले की वैद्यकीय व्यावसायिकांच्या नैतिकतेवर चर्चा करण्याची वेळ नसते. जे चुकीचं आहे, अमान्य आहे, आणि घृणास्पद आहे – याविरुद्ध उभं राहण्याची वेळ असते. त्यांच्या नैतिकतेवर चर्चा नंतर कधी केली जाईल, पण हल्ला झाल्यावर नाही!!

पण त्याच वेळी हेही लक्षात घ्यायला हवं की गेल्या काही दशकांत सार्वजनिक हुल्लडबाजी व उद्दामपणा हे एक सामान्य चित्र बनलं आहे — एखाद्या विशिष्ट व्यावसायिकांवर, व्यक्तीवर, जातीवर, धर्मावर किंवा भाषिक समूहावर. विविध जाती, सर्व धर्म आणि प्रत्येक राजकीय पक्ष, यांनी या सामूहिक दहशतीचा वापर आपल्या संकुचित आणि विकृत हेतूंकरिता केला आहे. हे रस्त्यावर उघड होतं, किंवा डिजिटल स्वरूपातही – ट्विटर/फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर. या सगळ्याच्या मुळाशी आहे एकच गोष्ट — वेडसर, मूर्खपणाची, नाश करणारी झुंडीची मानसिकता... सरळ आणि स्पष्ट!!

आठवतय जेव्हा रीयाच नाव सुशांत सिंग प्रकरणात आलं होतं. लष्करात वीस वर्ष सेवा केलेल्या एका डॉक्टरची मुलगी… अनुष्का, सुश्मिता, प्रियांका अश्या अनेकांकडे पाहात मुंबईत येते. व्हीजे असते. चार पाच फिल्म्स करते. एका उदयाला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडते. तो आत्महत्या करतो…!!

आणि एक भयाण चक्रीवादळ उठतं. त्या तरुणाचे नातेवाईक भलत्याच राज्यात आरोप काय करतात आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, डझनभर राजकीय पक्ष त्या वावटळीत काय येतात. चॅनलवरून आक्रस्ताळं आकांडतांडव करत त्या तरुणीला नशेडी, उधळी आणि कोणकोणत्या विशेषणांनी आंघोळ घातली जाते. तिचं चारित्र्य, भूतकाळ, संबंध, याची नाक्यावर चवीने चर्चा होते. तिचे खाजगी संवाद स्किनच्या वेशीवर टांगून बुभुक्षित गप्पा होतात. काहीही संबंध नसताना, विकृत प्रसिद्धीच्या लालसेतून, दुसरी एक अभिनेत्री हीला शिक्षा मिळावी, हे आयुष्याचं ध्येयच बनवते. ईडी, एनसीबी आणि सीबीआय या देशातल्या सर्वोच्च तपासणी संस्था तिला बसवून तासन्तास चौकश्या करतात. सगळं डिस्टन्स धाब्यावर बसवू माध्यमांच्या बुमच्या गराड्यात तिच्या वडिलांना इमारतीतून आत बाहेर करावं लागतं. ज्याच्या चौपट गांजा या शहरात शेकडो शाळा महाविद्यालयीन मुलं सर्रास घेत असतात, तेव्हढा गांजा जवळ असल्याचा संशय म्हणून तिच्या भावाला अटक होते. आणि या सर्वांवर कडी म्हणजे नुसती चौकशीला जाताना तिच्यावर माध्यमांचे प्रतिनिधी अक्षरशः शारीरिक हल्ला करतात…!!

लक्षात घ्या, रियाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नव्हता. स्वरा, तापसी यांच्यासारखी तिने कधीही राजकीय भूमिका घेतलेली नव्हती, नाही. कोणत्याही जातीधर्माच्या अगर महापुरुषाच्या बाजूने किंवा विरुद्ध विधानं किंवा चित्रपट केलेला नव्हती. ती फक्त एक धडपडणारी अभिनेत्री, ज्याला बॉलिवूड 'स्टारलेट' म्हणतं, तशी होती. तिचे वडील तर माजी लष्करी अधिकारी आहेत आणि तरीही तिचा परिवार काही आठवड्यांसाठी शब्दशः उध्वस्त झाला, कोणत्याही आरोपपत्राविना, न्यायालयात पोचायच्या आधीच तिची लक्तरं काढली गेली.

पण यात आश्चर्य काही नाही!! खरी अडचण ही आहे की आपल्या सुशिक्षित, डिग्री धारक वर्गाने हे जणू दुर्लक्षितच केलं आहे. आपण सहसा याकडे दुर्लक्ष करतो, कधीकधी गुपचूप सहानुभूती व्यक्त करतो किंवा वेळ आलीच तर सोयीसोयीने निषेध करतो. अनेकदा तर आपण अशा कृतींना "भावना दुखावल्या", "स्वाभाविक प्रतिक्रिया" किंवा "अपवादात्मक घटना" असं लेबल लावून त्यांचं समर्थन करतो. रियाबद्दलही सगळं घडत असताना शिकला सवरलेला वर्ग त्याकडे मुर्दाड दुर्लक्ष करत राहिला. ‘या बॉलीवूडच्या हिरोईनी असल्याच’ किंवा ‘एवढे सगळे म्हणतात तर तिने काहीतरी गुन्हा केलाच असेल’, अशी निर्बुद्ध शेरेबाजी करत बसला. आज न्यायालयाने तिला पूर्ण निष्पाप ठरवलेलं आहे.

डॉक्टरांविरुद्ध झालेली दंगल असेल, रिया, कामरा किंवा अशा अनेक घटना, हे आपल्यासाठी इशारे आहेत!जर आपण प्रत्येकवेळी, प्रत्येक हिंसेविरुद्ध – ती शारीरिक असो की डिजिटल – उभं राहत नाही, कोणत्याही समुदायावर, जातीवर, धर्मावर, कलाकारावर किंवा व्यक्तीवर झालेल्या आक्रमणाविरुद्ध बोलत नाही, तर हे Frankenstein पुन्हापुन्हा येणार, आणि आपल्यालाच छळणार. आणि मग आम्ही, म्हणजेच हा सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य असणार...

आणि हाच आहे ‘सामाजिक शरीरशास्त्राचा’ सर्वात महत्त्वाचा धडा — फक्त डॉक्टरांसाठी नाही, आपल्यापैकी प्रत्येकासाठी.

Tags:    

Similar News